कल्याण : कल्याण-डोंबिवलीला जोडणाऱ्या दोन पुलांच्या उद्घाटनाच्या ठिकाणावरून झालेल्या मानापमान नाट्यात खासदार असलेला आपला मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी डोंबिवलीत उद््घाटनाचा घाट घालणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी चांगलीच राजकीय कोंडी झाली. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांना शह देण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांवर कुरघोडीचा प्रयत्न केल्याने फडणवीस यांचे चिमटे हसतहसत ऐकून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. वस्तुत: दोन खासदारांमधील पुलाच्या श्रेयाचा हा वाद होता. पण शिवसेना स्टाइलने कपिल पाटील यांना उत्तर देण्याच्या नादात व्यासपीठावर बसून मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या त्यांना ऐकाव्या लागल्या. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी भर सभेत शिवसेनेच्या कुरघोडीचे उट्टे काढले आणि कपिल पाटील यांना गरजेपेक्षा अधिकच महत्त्व दिले. मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल मुंबईची मेट्रो ठाण्यापर्यंत आणण्याचे नियोजन आहे. ती कल्याण, डोंबिवली, भिवंडीला जोडण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. हा अहवाल एका इटालियन कंपनीकडून करुन घेतला आहे. मेट्रो कल्याण-डोंबिवली व भिवंडीपर्यंत आणण्याची तयारी सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. >पालकमंत्र्यांत दोष?शिवसेनेने भूमीपुजन करुन श्रेयाचे राजकारण केले. मात्र पालकमंत्री असल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. दोन्ही खाडी पुलासाठी सगळ््यांनीच सामूहिक प्रयत्न केल्याचे एकनाथ शिंदे भाषणात स्पष्ट केले. त्यातून त्यांची राजकीय अडचण सगळ््यांसमोर आली. तसेच रवींद्र चव्हाण यांना जास्त माहिती असल्याचा इशाराही त्यांनी केला. राज्यमंत्री चव्हाण यांनीही आपल्या भाषणात याआधीच्या पालकमंत्र्यांनी केवळ पोकळ आश्वासने दिल्याचा टोला गणेश नाईक यांचे नाव न घेता लगावला आणि न जाणे ‘पालकमंत्री’ या शब्दात काही दोष आहे का, असा उल्लेख केला. तसे होताच मुख्यमंत्र्यांनी ‘आत्ताच्या नाही, याआधीच्या,’ असे व्यासपीठावरून चव्हाण यांना सांगताच उपस्थितांंमध्ये एकच हशा पिकला. त्यात शिंदेही सामील झाले.>ट्रान्स्पोर्टेशन प्लॅन तयारमोठागाव ठाकुर्ली ते माणकोली आणि कोन ते दुर्गाडी हे पूल लवकरात लवकर तयार होतील. सरकारने ट्रान्स्पोर्टेशन प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, भिवंडी ही एमएमआर रिजनमधील गावे एकमेकांशी जोडली जातील. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली बाह्यवळण रस्ता (रिंगरोड) हा ८०० कोटीचा प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा काढण्यात आली आहे. आमदार किसन कथोरे यांच्या मागणीनुसार काटई ते ऐरोली या रस्त्यासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. >काळ्या झेंड्यांचे राजकारणपुलांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पूल प्रकल्पात जाणार आहेत, त्यांनी ही निदर्शने केली. त्यामुळे नाराज झालेले खासदार कपिल पाटील यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्यांना विकास कळत नसल्याची टीका केली. या आंदोलनामागे शिवसेना असल्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत ते म्हणाले, काल (शिवसेनेच्या भूमीपूजनावेळी) काळे झेंडे का दाखवले नाहीत? मुख्यमंत्र्यांनी मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला जाईल, असे जाहीर केले. >स्मार्ट कल्याण-डोंबिवलीसाठी अमेरिका दौराअमेरिकेत ६० हजार आयटी कंपन्या सहभागी होणार असलेल्या परिषदेसाठी मुख्यमंत्री अमेरिकेला रवाना झाले. तेथे ओरॅकल या आयटी कंपनीसोबत कल्याण- डोंबिवली शहरातील स्मार्ट योजनांसाठी करार केला जाईल, असा तपशील खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पुरवला. अनेक कामांसाठी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांशी तेथे चर्चा होणार आहे. त्यातून स्मार्ट शहरांतील विकासकामांसाठी निधी मिळेल. आताची अमेरिका वारी ही स्मार्ट कल्याण-डोंबिवलीसाठी असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. >कुरघोडी करणाऱ्या नेत्यांचे गुफ्तगू बनले चर्चेचा विषयपरस्परांवर कुरघोडी करणाऱ्या, एकमेकांना चिमटे काढणाऱ्या नेत्यांचे व्यासपीठावर सुरू असलेले गुफ्तगू, त्यांच्या कानगोष्टी उपस्थितांत चर्चेचा विषय बनल्या होत्या. त्यांचे राजकीय भांडण खरे की कानगोष्टी खऱ्या असा प्रश्नही कार्यकर्त्यांना पडला. ‘भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असताना लोकसभा निवडणुकीसाठी कल्याणला प्रचार सभेला जाण्यासाठी भिवंडीहून निघालो. तेव्हा दुर्गाडी पुलावर वाहतूक कोंडी पाहून एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवरुन कल्याणला निघालो. तरीही अर्धा तास लागला. आचारसंहितेमुळे भाषण दहा वाजता संपवायचे होते. कसाबसा दहा मिनिटे आधी पोचलो. कसेबसे भाषण उरकले. तेव्हा वाटले, भाषण झाले काय आणि नाही काय. पण या परिसरातील लोक किती त्रास सहन करतात. कल्याणच्या दुर्गाडी पुलावरील वाहतूक कोंडीचा मी स्वत: अनुभव घेतला आहे,’ असा किस्साही मुख्यमंत्र्यांनी सांगितला. >भिवंडी ग्रामीणसह शहरी भागातील विकासकामांसाठी एमएमआरडीएने 1,119 कोटींचा निधी दिला आहे. ग्रामीण भागाकरीता १६७ कोटी रुपये निधी दिला आहे. त्यासाठी गावांनी दहा टक्के हमी रक्कम उभी भरायची आहे.जिल्हा परिषदेने ही हमी रक्कम भरावी, एवढे परिषदेचे मोठे बजेट नाही; तर ग्रामपंचायतींची आर्थिक कुवत नाही. त्यामुळे दहा टक्के हमी रकमेची अट शिथील करण्याची मागणी खासदार पाटील यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सवलत देताना त्यांना विकासाशी बांधून घेणे व तसेच त्यांची मालकी कशी राहील, याचा धोरणात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
मुलाच्या हट्टापायी पालकमंत्र्यांची कोंडी
By admin | Published: September 19, 2016 3:32 AM