- राजरत्न सिरसाटअकोला : अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यावर्षी उडीद पिकावर मंत्रोपचार, तंत्र, मंत्र विधी करण्यात आला. महाराष्टÑ कृषी शिक्षण व संशोधन (एमसीईएआर) परिषदेने प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यापीठासोबत या विधीसाठीचा सामंजस्य करार केला असून, त्यानुसार हा प्रयोग करण्यात येत आहे.मंत्रोपचाराने पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे वक्तव्य डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले होते. त्यानंतर बरेच वादंग झाले. मंत्रोपचार विधीचा हा प्रकल्प ‘एमसीईएआर’ने दिल्याचे समोर आले आहे. ‘एमसीईएआर’च्या निर्देशानुसार यावर्षी जून, जुलैमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागांतर्गत सेंद्रिय शेती प्रकल्पाच्या चार वेगवेगळ्या क्षेत्रावर उडीद पेरणी करण्यात आली होती. उत्पादन वाढीसाठी त्या संस्थेच्या सदस्यांनी पिकावर मंत्रोपचार केले. वैदिक पद्धतीने तंत्र-मंत्र यज्ञही पार पडले. यासोबत कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या पद्धतीने विज्ञानाच्या आधारे प्रयोग केले. सप्टेंबरमध्ये उडीद पीक काढण्यात आले असून, तीन वर्षे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या चारही क्षेत्रांवरील उडीद पिकांचे वजन करू न निष्कर्ष काढण्यात येणार आहे.१७ आॅक्टोबर रोजी ‘एमसीईएआर’ची मुंबईत कृषी मंत्र्यांच्या दालनात बैठक होणार आहे. या विषयावर यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने वैदिक तंत्र-मंत्र, चुंबकीय पद्धत वापरण्यासाठी तीन वर्षांचा प्रकल्प मिळाला आहे. यावर्षी हा विधी उडीद पिकावर करण्यात आला. प्रकल्प संपल्यानंतर निष्कर्ष काढण्यात येतील.- डॉ. विनोद खडसे, कृषी विद्या विभाग (सेंद्रिय प्रकल्प), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
‘ब्रह्मकुमारी’ करणार पीकवाढीसाठी मंत्रोपचार; तीन वर्षांनी निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 3:53 AM