पुणे : समाजात असमानता निर्माण करण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र ही असमानता निर्माण करणा-या ’’बारामतीकरांच्या’’ लक्षात येत नाही की, यापूर्वीही देशाचे नेतृत्व ब्राह्मण समाजाने केले आहे आणि यापुढेही करेल, असे वक्तव्य कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. या विधानावरून पुन्हा शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ब्रह्मोद्योग-२०१८ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, अभिनेत्री मृणाल देव, आमदार शोभा फडणवीस, आमदार मनीषा कायंदे, महिला आघाडीच्या मोहिनी पत्की यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 'मातृशक्तीचा जागर' मेळाव्यात उद्योजिका जयंती कठाळे, मोहिनीताई मोडक, आरजे शोनाली रानडे, सविता वासेकर, मंजुश्री कुलकर्णी यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला
या कार्यक्रमात कुलकर्णी म्हणाल्या की, संत ज्ञानेश्वरांनी दुस-यासाठी पसायदान मागितले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी देशासाठी आपले आयुष्य झिजवले. अशाप्रकारे ब्राह्मण समाज पूर्वीपासून दुसऱ्यांसाठी झटत आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मेकॉलेने भारतीय समाजात ज्या पद्धतीने फूट पाडली, तसा प्रयत्न बारामतीकर करत आहेत. स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी बारामतीकर 'मेकॉले' याला वाटेला लाव, त्याला वाटेला लाव असे करून आज समाजात दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला.
पुरुषाबरोबरच प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांनी आघाडी घेतली आहे. आपल्या कष्टाने त्या यशस्वी झाल्या आहेत. मात्र समन्वय साधण्यासाठी स्त्री-पुरुषांनी एकमेकांना समजून काम केले पाहिजे. आज महिलांसाठी कोणतेही क्षेत्र निषिद्ध नाही. अभिनयासह कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करा; पण त्यासोबतच मूल्ये आणि तत्वे सोडू नका. महिलांनी 'सुपरवुमन' बनण्याच्या मागे लागू नये. असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव - कुलकर्णी यांनी व्यक्त केले.