आप्पासाहेब पाटील
सोलापूर : ब्रेन ट्युमर हा मेंदूच्या कॅन्सरशी संबंधित आजार आहे. यामध्ये लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. त्याचे वेळीच निदान व उपचार केले तर तो बरा होऊ शकतो आता यावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पध्दती सोलापुरात उपलब्ध आहेत. ब्रेन ट्युमर झालेले रुग्ण उपचारानंतर सर्वसामान्य जीवन जगू शकतात. या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तंबाखू, दारू, सिगारेट आदी व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला सोलापुरातील प्रसिध्द न्युरोलॉजिस्ट डॉ़ प्रसन्न कासेगांवकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिला.
जागतिक ब्रेन ट्युमर दिवसाच्या पूर्वसंध्येला न्यूरोलॉजिस्ट डॉ़ प्रसन्न कासेगांवकर यांच्याशी साधलेला संवाद़ ब्रेन ट्युमरविषयी माहिती देताना कासेगांवकर यांनी सांगितले की, सन २००० पासून प्रत्येक वर्षी आठ जून हा जागतिक ब्रेन ट्युमर दिवस म्हणून पाळला जातो.
ब्रेन ट्युमरविषयी समाजात जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात दरदिवशी किमान ५०० रुग्णांना ब्रेन ट्युमर झाल्याचे आढळून येत आहे. या आजाराची नेमकी काय कारणे आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही.
ब्रेन ट्युमरचे निदान हे डोक्याचा एक्स-रे, एमआरआय, पेट स्कॅन, मणक्यातील पाण्याचे परीक्षण याद्वारे होऊ शकते. निदान झाल्यावर शल्यचिकित्सा, रेडिओ थेरपी, केमिओथेरपी तसेच औषधांच्या माध्यमातून ब्रेन ट्युमरवर उपचार केला जाऊ शकतो.
डॉक्टरांशी थेट सवाल...प्रश्न : काय आहे ब्रेन ट्युमर आजार? कासेगांवकर : मेंदूमध्ये अनावश्यक पेशींची वाढ झाल्यानंतर मेंदूवर दाब वाढतो़ त्यामुळे मेंदूत एक प्रकारची गाठ निर्माण होते त्याला ब्रेन ट्युमर असे म्हणतात़ ही गाठ मेंदूतील अनेक भागांना धोका निर्माण करते.
प्रश्न : कोणत्या वयातील लोकांमध्ये हा आजार आढळून येतो ?कासेगांवकर : ब्रेन ट्युमर हा आजार १ ते ९० वय वर्षापर्यंत कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो़ आजाराला वयाची मर्यादा नाही़ मात्र लहान वयातील मुलांना विना कॅन्सरचा ब्रेन ट्युमर होण्याचे प्रमाण असते तर चाळीशी ते पन्नाशीतील व्यक्तीला कॅन्सरव्दारे होणारा ब्रेन ट्युमर होऊ शकतो़ वयोमानानुसार ब्रेन ट्युमरचे प्रकार वेगवेगळे असू शकतात.
प्रश्न : ब्रेन ट्युमरचे किती प्रकार आहेत व ते कोणते ?कासेगांवकर : साधारण: ब्रेन ट्युमर या आजाराचे दोन प्रकार आहेत़ ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदूमधील अनियंत्रित पेशींची होणारी वाढ आहे़ ही वाढ पटकन लक्षातही येत नाही. ब्रेन ट्युमरमध्ये दोन प्रकारच्या गाठींचा समावेश असतो. एक म्हणजे कॅन्सरविरहित आणि दुसरी कॅन्सरची. पहिला हा बिनाइन ट्युमर असून, या प्रकारात मेंदूच्या नेहमीच्या पेशींना कुठेही धक्का न लावता ट्युमर वाढतो आणि आॅपरेशन करून हा ट्युमर काढून टाकला तर या विकारापासून मुक्ती मिळू शकते. दुसरा प्रकार हा मेलिग्नंट ट्युमर हा आहे. हा ट्युमर मात्र कॅन्सरचा असतो. त्याचे आॅपरेशन केले, तरी कॅन्सरग्रस्त पेशींची पुन्हा वाढ होऊ शकते तसेच हा प्रकार घातक आहे.
प्रश्न : ब्रेन ट्युमरची लक्षणे काय आहेत ?कासेगांवकर : डोकेदुखी ब्रेन ट्युमरचे महत्त्वाचे लक्षण आहे. या व्यतिरिक्त उलट्या होणे, शरीराचा एक भाग जड होणे, गुंगी येणे, डबल दिसणे, वारंवार शरीराचा तोल जाणे, डोके जड पडणे, स्मरणशक्तीचा लोप पावणे, डोक्यासोबत मान दुखणे, चालताना अडखळणे ही लक्षणे दिसून येतात. तसेच उलट्या, फिट्स येणे, दृष्टिदोष, तिरळेपणा, बोलण्यात अडखळणे, मानसिक अस्वस्थता, शुद्ध हरपणे तसेच झोपाळू वृत्ती आदी लक्षणेही दिसून येतात.
मुंबई, पुणे नाही सोलापूरच...- एखादा गंभीर आजार झाला की लोक मुंबई, पुण्याचे नाव घेतात़ सोलापूर हे मेडिकल हब म्हणून प्रसिध्द होत आहे़ कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, मराठवाडा आदी राज्यातील रूग्ण उपचार घेण्याकरिता सोलापूरला येऊ लागले आहेत़ आता येथे जगातील कोणत्याही आजाराचे निदान लवकर व सुरक्षितपणे होऊ शकतो़ एवढेच नव्हे तर माफक दरात कोणत्याही आजाराचे निदान सोलापुरात होते़ त्यामुळे आता मुंबई, पुणे नाही तर सोलापुरातच निदान करायचे असा अट्टहास रूग्णांच्या नातेवाईकांकडून होत असल्याची माहिती न्यूरोलॉजिस्ट डॉ़ प्रसन्न कासेगांवकर यांनी सांगितले़
ब्रेन ट्युमरपासून दूर रहायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने व्यसनापासून दूर राहावे, प्रदूषणमुक्त जीवन जगावे, शक्य होईल तेवढे वायु प्रदुषणापासून दूर रहावे़ तंबाखू व दारूमुळे कॅन्सरच्या गाठी तयार होण्याचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे व्यसनापासून दूर रहा, सकस व पोषक घ्या, वेळोवेळी तपासण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या़ ब्रेन ट्युमर हा आजार गंभीर आजार नसून सोलापुरात यावर उपचार होऊ शकतो.-डॉ़. प्रसन्न कासेगांवकर,प्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट, सोलापूर