मुंबई : महिला बचतगटांमार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंचे जास्तीत जास्त मार्केटिंग होणे गरजेचे आहे. यासाठी ही उत्पादने विविध डिपार्टमेंटल स्टोअर्ससह आॅनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होणे गरजेची आहेत. बचतगटाच्या चळवळीतून ग्रामीण अर्थक्रांतीला गती देण्यासाठी बचतगटांच्या उत्पादनांचे पॅकिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग व त्यासंदर्भातील प्रशिक्षण आवश्यक असून शासन हे सर्व उपलब्ध करून देईल, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी बुधवारी सांगितले.वांद्रे रेक्लेमेशन मैदान येथे बुधवारी महिला बचतगट आणि कारागिरांच्या उत्पादनांच्या ‘सरस महालक्ष्मी २०१७’ या प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्यासह देशभरातील विविध भागांतून आलेल्या महिला बचतगटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.या वेळी राज्यपाल व मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. शासनाने सुमतीबाई सुकळीकर स्वयंसाहाय्यता बचतगट अर्थसाहाय्यता योजनेतून महिला बचतगटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या योजनेतून महिला बचतगटांची चळवळ अधिक गतिमान होईल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. प्रदर्शनात देशाच्या विविध भागांतील साधारण ५११ बचतगटांनी सहभाग घेतला आहे. हे प्रदर्शन २३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. वारली चित्रकला, कागदी मुखवटे, ज्यूट वस्तू, चामडी बॅग, पैठणी साड्या, राजस्थानी मोजडी, पेंडिंग्ज, पोचमपल्ली साड्या, कोल्हापुरी चप्पल, काश्मिरी शॉल्स यांच्यासह विविध प्रकारच्या भेटवस्तू तसेच महाराष्ट्रीयन आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातील खाद्यपदार्थांची रेलचेल प्रदर्शनात आहे. (प्रतिनिधी)
बचतगटांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 5:32 AM