नाशिक : नाशिकच्या कुंभमेळ्यात पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यांत उज्जैन येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे ब्रॅण्डिंग करण्यात येणार आहे. यासाठी उजैनचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले असून, साधुग्राममध्ये स्टॉल उभारण्याबरोबरच शहरात ठिकठिकाणी फलक उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यानंतर आठ महिन्यांनी येणाऱ्या उज्जैनच्या कुंभमेळ्याचीही मध्य प्रदेश सरकारकडून तयारी सुरू आहे. पुढील वर्षी २२ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणाऱ्या या कुंभमेळ््यास भाविकांसह साधू-महंतांनी यावे यासाठी सरकारने नाशिकच्या कुंभमेळ्यात ब्रॅण्डिंगची तयारी चालविली आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे साधुग्राममध्ये उज्जैनच्या कुंभमेळ्याची माहिती देण्यासाठी स्टॉल उभारण्याकरिता जागेची मागणी केली आहे. याशिवाय शहरात ठिकठिकाणी उज्जैनच्या कुंभाचे आमंत्रण देणारे जाहिरातवजा फलक उभारण्याचीही परवानगी मागितली आहे. नाशिकच्या तयारीची माहिती संकलित केली जात आहे.
उज्जैनच्या कुंभमेळ्याचे नाशिकात ब्रॅण्डिंग
By admin | Published: July 10, 2015 2:26 AM