मुंबई : महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे ब्रँडिंग करण्यासाठी ‘मुंबई हाट’च्या माध्यमातून महिला बचतगट मॉल सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महिला बचतगटांसाठी मुंबईत सब-वे मॉल सुरू करण्यासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. महिला बचतगटांच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची विक्रीदेखील महिलांनीच करावी या उद्देशाने कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर ‘मुंबई हाट’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमालगत असणाऱ्या भुयारी मार्गात बचतगटांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी स्टॉल्स दिले जाणार आहेत. या भुयारी मार्गात नऊ मार्गिका असून तेथे डिजिटल म्युझियम, दागदागिने, गृह सजावटीच्या वस्तू, सेंद्रीय पद्धतीने बनवलेले खाद्यपदार्थ, सेल्फी झोन असे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आठवड्यातील चार दिवस ‘मुंबई हाट’ हा प्रकल्प राबविण्यात यावा. दक्षिण मुंबईप्रमाणेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही असा प्रकल्प सुरू करावा. मॉल सुरू झाल्यावर स्वच्छता राखली जाईल आणि भुयारी मार्गांमध्ये अतिक्रमण होणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी ‘मुंबई हाट’ या उपक्रमाबाबत सादरीकरण केले. आयुक्त अजय मेहता, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महिला बचतगटांचे करणार ब्रँडिंग
By admin | Published: June 21, 2016 3:43 AM