लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भायखळा कारागृहात शुक्रवारी कैदी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर इतर कैद्यांनी शनिवारी तोडफोड करीत तब्बल पाच ते सहा तास गोंधळ घातला. यात काही पोलीस जखमी झाले. त्यामुळे कारागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले. हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारी मंजुळा गोविंद शेट्ट्ये (३२) ही शुक्रवारी रात्री बराकीमध्ये चक्कर येऊन कोसळली. तिला तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जेलरने मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप अन्य महिला कैद्यांनी केला आहे.शनिवारी सकाळी संतप्त महिला कैद्यांनी कारागृहातच धरणे आंदोलन केले. दोषी जेलरवर कारवाईची मागणी करत, त्यांनी कारागृहातील टेबल, खुर्चीची तोडफोड केली, तसेच तेथील कर्मचाऱ्यांवर भांडी फेकून मारल्याने प्रकरण चिघळले. त्यानंतर, २५ ते ३० महिला कैद्यांनी कारागृहाच्या छतावर चढून कपडे जाळून निषेध व्यक्त केला. यामध्ये पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कारागृह प्रशासन, नागपाडा पोलिसांनी कैदी महिलांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तब्बल पाच ते सहा तास गोंधळ सुरू होता. अखेर प्रशासनाने याबाबत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मंजुळा हिच्या मृत्यूची ह्यअपमृत्यूह्ण म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. कारागृहातील परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणी महिला कैद्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. या ठिकाणी सहा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कामात निष्काळजी दाखविल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह पाच सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. - डॉ. भूषण कुमार उपाध्याय, अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवामंजुळा शेट्ट्ये हिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर जखमा आढळून आल्या असून, यामध्ये पाठीसह डोक्यावरील जखमांचा समावेश आहे. जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून, तिच्या शरीरातील नमुने वैद्यकीय तपासासाठी पाठविण्यात आले आहेत.- डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय
भायखळा कारागृहात कैद्यांची तोडफोड
By admin | Published: June 25, 2017 2:29 AM