पुणे : लांबलेल्या पावसामुळे भात, ज्वारी, बाजरी, नाचणी या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाकरीचे पीक करपल्याचे चित्र असून, भाताचे देखील नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पावसाअभावी राज्यातील पेरण्या रखडल्या होत्या. त्याचा फटका खाद्यान्न पिकाला बसला आहे. सोयाबीन, मका, कापूस, ऊस ही पिके वगळता इतर पिकांच्या पेरण्यांना फटका बसला आहे. राज्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र १३४.७० लाख हेक्टर असून, त्यापैकी १२६.५० लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात अॅगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत सरासरी ८७०.५० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा केवळ ५६५ मिलिमीटर (६४.९ टक्के) पाऊस झाला. त्यातही जालना, बीड, लातुर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ २५ ते ५० टक्के पाऊस झाल्याने पेरण्यांची स्थिती बिकट आहे. भाताचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९२ हजार ६०० हेक्टर असून त्यापैकी १२ लाख ७२ हजार ६०० (८५ टक्के) हेक्टरवरील पेरण्या झाल्या आहेत. ज्वारीचे क्षेत्र ११ लाख ४४ हजार ४०० हेक्टर असून, ४ लाख ३३ हजार ८०० (३८ टक्के) हेक्टर, तर बाजरीची ११ लाख ३३ हजार ८०० पैकी ५ लाख ८२ हजार ८०० हेक्टरवर (५१ टक्के) पेरणी झाली आहे. नाचणीचे क्षेत्र १ लाख २५ हजार ९०० हेक्टर असून, ७६ हजार १०० (६० टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे क्षेत्र ६ लाख हेक्टरवरून ७ लाख ४० हजार ८०० (१२३ टक्के) हेक्टरपर्यंत वाढले आहे. तूर, मूग, उडीद व इतर कडधान्यांचे सरासरी क्षेत्र २२ लाख ४७ हजार २०० हेक्टर असून, १५ लाख ५६ हजार ७०० हेक्टरवरील (६९ टक्के) पेरणीची कामे उरकली आहेत. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २७ लाख ९९ हजार ४०० हेक्टरवरून ३६ लाख ७० हजार ३०० (१३१ टक्के) हेक्टरवर पोचले आहे. कापसाचे क्षेत्र ३३ लाख ५६ हजार ४०० हेक्टरवरून ४० लाख २९ हजार २०० (१२० टक्के) हेक्टरवर गेले आहे. ऊसाचे क्षेत्र ९ लाख ५५ हजार १०० हेक्टरवरुन ११ लाख ७० हजार ७०० हेक्टरवर (१२३ टक्के) गेले आहे. (प्रतिनिधी)
भाकरीचे पीक करपले!
By admin | Published: August 29, 2014 3:11 AM