अमरावती : शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत अमरावती विभागाला अडीच कोटी व जिल्ह्याला ७० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. यासाठी कृषी व वन विभागासह अन्य विभागाने तयारी केली आहे. मात्र जूनपासून पावसाने दडी मारल्याने तूर्तास या योजनेला ब्रेक लागला आहे. वातावरणातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षांची आवश्यकता आहे. आधुनिक युगात ग्लोबल वार्मिंगमुळे तर निसर्गच बदलत आहे, या पार्श्वभूमीवर शतकोटी वृक्ष लागवड योजना महत्त्वाची आहे. यासाठी शासनाचे विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था याद्वारे वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. एकूण पर्यावरण क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र हे वृक्षाच्छादित असले पाहिजेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. राज्यात मात्र हे क्षेत्र केवळ २१ टक्केच असल्याने मागील काही वर्षांपासून ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविणे महत्त्वाचे आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यात वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात येते. यामध्ये २० कलमी कार्यक्रमांतर्गत वन विभाग, महाराष्ट्र वन विभाग महामंडळ आणि सामाजिक वनीकरण विभाग यांना दरवर्षी वृक्ष लागवडीचे ‘लक्ष्यांक’ देऊन करोडोचा निधी उपलब्ध करण्यात येतो.मागील पाच वर्षांत या विभागाद्वारे वृक्षारोपणावर ३५६ कोटी ६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक निधी वन विभागाला २७५ कोटी ३५ लक्ष रूपये, महाराष्ट्र वन विकास महामंडळाला २६ कोटी १२ लक्ष व सामाजिक वनीकरण विभागाला ५४ कोटी ५९ लाख रूपये देण्यात आलेले आहे. करोडो रूपयांचा शासन निधी यावर खर्च करीत असताना पावसाच्या लपंडावामुळे योजनेत अडथळे येत आहेत. (प्रतिनिधी)
पावसाने दडी मारल्याने ७० लाख वृक्ष लागवडीला ‘ब्रेक’
By admin | Published: July 07, 2014 12:56 AM