वसंत भोईर,
वाडा-संपूर्ण तालुक्यातील भूमीपुत्र पाण्याच्या थेंबासाठी तरसत असतांना बहुराष्ट्रीय कोकाकोला कंपनीला मात्र वैतरणा नदीतून दिले जात असलेले लक्षावधी लिटर पाणी तातडीने बंद करावे, अन्यथा जनता पाईपलाईन तोडून हे पाणी बंद करेल असा इशारा आज अनेक पक्षांनी व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिला. तालुक्यातील कुडूस येथील हिंदुस्थान कोका कोला ही कंपनी दिवसरात्र लाखो लिटर पाणी वैतरणा नदीतून उचलते. सध्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई सुरू आहे. तालुक्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या आशिर्वादाने कंपनी दररोज महमूर पाणी धेते याला वाड्यातील नागरिकांनी विरोध दर्शविला असून कोकाकोलाचे पाणी तत्काळ बंद करा, अन्यथा ही पाईप लाईन तोडून टाकू असे प्रशासनाला बजावले आहे. शिवसेना, मनसे, बविआ, राष्ट्रवादी, कुणबी सेना या सर्वच पक्षांनी यापूर्वी इशारे दिले. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीत तसे ठरावही संमत झाले. तरी प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे जनता संतप्त आहे. महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती कंपन्यांच्या पाणी पुरवठ्यावर निर्बंध लादले गेले. त्यात ४० टक्के कपात राज्यसरकारने केली मग कोकाकोलावर मेहेरनजर कोणाची आहे, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. वाडा तालुक्यात १ मार्च पूर्वीच, नद्या विहीरी व कुपनलीकेच्या पाण्याची पातळी झपाटयाने खाली गेली आहे. कित्येक वर्षापासून भूजलाच्या पाण्याचा सर्व्हे झालेला नाही. तो झाला पाहीजे तालुक्यात बहुतांशी कूपनलीका, पिण्याच्या पाण्याच्या विहीरी व नदी नाले मार्च पासूनच कोरडे पडलेले आहेत. यामुळे भूमीपुत्र संतप्त आहेत.