ठाणे : वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) लागू करून त्याआधारे मुंबईचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट सुरू असल्याचा पुनरुच्चार केला. या कराची रक्कम गोळा करण्याचे अधिकार पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडेच राहू द्यावे, त्यातून गोळा झालेले पैसे त्यांच्याकडे राहतील. आपल्या हिश्शाची रक्कम त्यातून वसूल करून राज्य आणि केंद्राचा वाटा त्यांना देण्याची मुभा पालिकांना मिळावी. अन्यथा, पालिकांची आर्थिक घडी विस्कटेल, हा मुद्दाही त्यांनी जीएसटी अधिवेशनानिमित्ताने पत्रकार परिषदेत पुन्हा मांडला. पालिकांची आर्थिक स्वायत्तता केंद्र सरकारच्या हाती देण्यास मनसेचा विरोध असून, त्याला सर्वपक्षीय आमदारांनीही विरोध करावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. नव्या प्रणालीमुळे केंद्राकडून वेळेत पैसे आले नाहीत, तर शहरातील मोठ्या महापालिका कोलमडतील, असे त्यांनी स्पष्ट केले.पर्युषण पर्वात शाकाहारी-मांसाहारी सोसायट्यांचा वाद वाढवून भाजपा आपल्या मतपेटीवर डोळा ठेवत आहे. विशिष्ट समुदायाची मते पदरात पडावी म्हणून निवडणुकीच्या तोंडावर असे वाद वाढवले जातात, असा आरोप त्यांनी केला. महापालिका, विधानसभा, लोकसभेत अमराठींची संख्या वाढवण्यासाठीचा हा खटाटोप असल्याचा दावा त्यांनी केला.
जीएसटीच्या नावाखाली मुंबई तोडण्याचा डाव
By admin | Published: August 29, 2016 6:38 AM