राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेला ब्रेक; अजित पवारांची भूमिका काय?
By यदू जोशी | Published: May 6, 2023 07:39 AM2023-05-06T07:39:55+5:302023-05-06T08:45:24+5:30
ईडी व सीबीआय कारवाई टाळण्यासाठी खेळलेली चाल, ही ठरली वावडीच
मुंबई - शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या त्या स्वत:च पदावर कायम राहण्याच्या त्यांच्या निर्णयाने संपुष्टात आल्या. तसेच राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेलाही ब्रेक लागला. पवार कुटुंबातील काहीजण ईडी, सीबीआयच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख तुरुंगात गेले होते, नवाब मलिक तुरुंगात आहेत, हसन मुश्रीफ यांच्यावर कधीही मोठी कारवाई होऊ शकते. तपास यंत्रणांच्या कचाट्यातून पक्षाला सोडवायचे असल्याने पवार हे नंतरच्या पिढीला भाजपसोबत जाणे सोपे व्हावे म्हणून पदावरून दूर झाले आहेत, असेही विश्लेषक सांगत होते. मात्र तेही पवार यांनी खोटे ठरविले.
राजकीय पंडितांची अनेक भाकिते फोल
शरद पवार राजीनामा मागे घेणार नाहीत. ते त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवतील आणि राज्यात विरोधी पक्षनेते व त्यांचे पुतणे अजित पवार यांना सर्वाधिकार देतील, असे भाकीत केवळ माध्यमेच नव्हे तर अनेक राजकीय पक्षांचे नेतेही खासगीत वर्तवित होते. सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याकडे अनुक्रमे केंद्र व राज्याची धुरा सोपविली की ते दोघे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतील व नव्या नेतृत्वाने निर्णय घेतला आहे, असे म्हणत शरद पवार कानावर हात ठेवतील, असा तर्कही राजकीय पंडित देत होते. पवार यांनी या सर्व शक्यतांना कात्रजचा घाट दाखवला आहे.
भाजपविरोधाची धार अधिक तीव्र करणार?
१९७८ मध्ये पुलोदचा प्रयोग करताना जनसंघाला पवार यांनी मंत्रिमंडळात सामावून घेतले होते. हा अपवादवगळला तर पवार यांचे राजकारण हे भाजपविरोधीच राहिले आहे. आज भाजपसोबत जाण्याचा दबाव पक्षात असताना तसा निर्णय झालाच तर त्या निर्णय प्रक्रियेचा आपण भाग नव्हतो हे सांगण्यासाठी पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचीही जोरदार चर्चा होती. मात्र, भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरणाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता पवार हे भाजपविरोधाची धार अधिक तीव्र करतील असेच आजच्या निर्णयावरून दिसते.
भाजपच्या प्रयत्नांना खीळ?
राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या संघर्षातून भाजपसोबत जाण्याचा निर्णय होईल, अशी आशा लावून असलेल्यांचीही तूर्त निराशा झाली आहे.पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिंदे यांना राज्यातून किमान ४२ जागा निवडून आणायच्या आहेत.अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी हा नवा मित्रपक्ष जोडण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न भाजपकडून केले जात होते. त्या प्रयत्नांनाही आता खीळ बसली आहे.
अजित पवारांची भूमिका काय?
पक्षातील सर्वच नेते शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून आर्जव करत असताना एकटे अजित पवार हे नवीन अध्यक्ष पक्षाला मिळाले तर काय बिघडले, अशी भूमिका घेत होते. मात्र ही भूमिका मान्य झाली नाही, स्वत: शरद पवार यांनीही ती मान्य केली नाही. आता अजित पवार कुठली पाऊले उचलतात याबाबत उत्सुकता असेल.