मुंबई : राज्यात २०१६-१७ या वर्षात आजवरचे सर्वाधिक कृषी सिंचनाचा आकडा गाठण्यात यश आले आहे. यंदा तब्बल ४० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. हा आजवरचा विक्रम आहे. या आधी २०१२ मध्ये ३२ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. खरिप व रब्बी हंगाम मिळून ३७.२२ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली तर, सध्याच्या उन्हाळी हंगामात २ लाख ८० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जात आहे. पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठीचे पाणी दिल्यानंतर कृषी सिंचनासाठी शिल्लक पाण्याच्या वाटपाचे नियोजन पहिल्यांदाच अचूक पद्धतीने करण्यात आल्याने हे यश आले आहे. राज्यातील मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांवरील कालवे सल्लागार समित्या अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि सक्षम करण्यासाठी त्यांची पुनर्रचना करण्यात आली. हंगामाच्या सुरुवातीला समित्यांच्या प्रकल्पनिहाय बैठकी घेण्यात आल्या. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, त्यांना गेट लावणे अशी उपाययोजनाही करण्यात आली. सिंचन प्रकल्पांतून ळिणाऱ्या पाणीपट्टीची रक्कम सिंचन व्यवस्थापनासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंचन व्यवस्थापनासाठी १२०० अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. गाव ते राज्य पातळीपर्यंत सिंचन क्षेत्र आणि पीकक्षेत्राची माहिती संकलित करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली. या उपाययोजनांचा पाणीवाटप व्यवस्थापनासाठी फायदा झाला, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतला सांगितले.
राज्यात सिंचनाचा विक्रम मोडला
By admin | Published: April 21, 2017 2:51 AM