- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश भाजपच्यावतीने राज्यात आयोजित करण्यात आलेल्या संवाद यात्रेला पक्षश्रेष्ठींनी ब्रेक लावल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे आता या यात्रेचे स्वरूप बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा संवाद यात्रांच्या माध्यमातून जनतेसमोर जाण्याची भूमिका प्रदेश भाजपने घेतली होती. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल, महापालिका, नगरपालिकांच्या प्रभागांमध्ये संवाद यात्रा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी या यात्रेला अनुमती दिली नसल्याचे समजते.
या यात्रांद्वारे कोणाकोणाशी भाजप संपर्क साधणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट असेल. या आधी बावनकुळे म्हणाले होते की, राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये या यात्रा जातील, जनतेशी संवाद साधतील. केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची माहिती जनतेला दिली जाईल. मात्र, भाजपकडील संभाव्य मतदारसंघांवर यात्रांचा जास्त फोकस ठेवावा, असे भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींचे मत असल्याचे समजते. राज्यात व विशेषत: मराठवाड्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे तणावाची स्थिती आहे. संवाद यात्रेचा उद्देश कितीही चांगला असला तरी काही ठिकाणी संघर्ष झाला तर त्यातून चांगला संदेश जाणार नाही, असेही कारण सांगितले जात आहे.
अमित शाह-अजित पवारांची पुण्यात भेटकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २० आणि २१ जुलै रोजी निमित्ताने पुण्यात होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची बैठक झाली. शरद पवार यांना शह देण्यासंदर्भात मुख्यत्वे चर्चा झाली, असे समजते. शाह यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी भाजपच्या वीसेक ज्येष्ठ नेते, आमदारांशी चर्चा केली.
संवाद बैठकांचा पर्याय आधी जाहीर केलेल्या भूमिकेनुसार संवाद यात्रा काढता येत नसतील तर विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवादाच्या बैठका घेण्याचा पर्याय आता समोर आला आहे. यावर लवकरच निर्णय होईल.