पुणे : राजकीय पक्षांचे गटनेते तसेच भाजपचे नगरसेवक वगळता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व शिवसेनेतील मातब्बर नगरसेवकांच्या प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याचे प्रकार उजेडात येत आहे. नगरसेवकांनी अनेक वर्ष जपलेल्या त्यांच्या परंपरागत मतदारांमध्ये फुट पाडण्याचे अनेक प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पध्दतशीरपणे पोहचवली जात आहे. प्रभाग रचनेच्या या मोडतोडीने नगरसेवक चांगलेच धास्तावले आहेत.आगामी महापालिका निवडणूक ४ सदस्यांचा एक प्रभाग यानुसार पार पडणार आहे. त्यासाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने ४१ प्रभागांची रचना तयार करून त्याचा आराखडा विभागीय आयुक्तांच्या समितीकडे सादर केला. या समितीने त्याचा आढावा घेऊन त्यामध्ये आवश्यक वाटतील ते बदल करून तो १२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. आपल्या प्रभागाची रचना कशी झाली आहे याची माहिती बहुतांश नगरसेवकांपर्यंत पोहचली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनच ही माहिती नगरसेवकांपर्यंत पोहचवली जात आहे. त्यामध्ये तुमचा प्रभाग फोडला असून तो भाजप मतदार जास्त संख्येने असलेल्या भागाला जोडला आहे असे त्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता वाढली आहे. यातून काय मार्ग काढता येईल यावर विचार सुरू झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जर प्रभाग रचना झाली नसेल तर त्याविरूध्द निवडणूक आयोगाकडे १० आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबर दरम्यान याविरूध्द दाद मागता येऊ शकणार आहे. त्यावर विचार करून आयोगाकडून अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाईल. (प्रतिनिधी)>प्रभाग रचनेला उत्तर दिशेकडून सुरूवात करण्यात येऊन त्यानंतर पूर्व वळावे. पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि प्रभागरचनेचा शेवट दक्षिण दिशेला करावा असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील याची पुरेपुर काळजी घ्यावी. वस्त्यांचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही. तसेच सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले यांचा वापर करावा अशा सूचना आहेत.
प्रभागांची मोडतोड; धास्ती इच्छुकांना
By admin | Published: September 19, 2016 1:21 AM