मनीषा म्हात्रे,
मुंबई- सुट्टी संपवून मुंबईला परतण्याच्या तयारीत असतानाच १७ जणांवर काळाने घाला घातला. आरक्षित केलेल्या बसचे ब्रेक फेल झाल्याने दोन तास बसची वाट पाहण्यापेक्षा आलेल्या बसमधून जाण्यासाठी २३ प्रवासी तयार झाले. एजंटने देखील बस भरलेली असतानाही पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी प्रवाशांना बसमध्ये कोंबले. याच निष्काळजीपणामुळे क्षमतेबाहेर भरलेल्या प्रवाशांना जीव गमवावा लागला. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पनवेलजवळील शेडुंग गावात रविवारी पहाटे बस-कारच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला. तर ४७ प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये १० महिला, ६ पुरुष आणि एका २ वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये बसलेल्या २३ प्रवाशांचे बुकींग हे दुसऱ्या बसमध्ये करण्यात आले होते. मुंबईहून येणारी बस त्यांना साताऱ्यातून मुंबईकडे घेऊन येणार होती. दरम्यान घटनेच्या आदल्या दिवशी मुंबईच्या प्रवाशांना साताऱ्याला नेत असताना त्या बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे गाडी मध्येच थांबवून गाडीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करावे लागले. दुसऱ्या दिवशी साताऱ्यात ज्या स्पॉटहून मुंबईसाठी गाडी सुटणार होती तेथे पोहोचणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे बसची वाट पाहत असलेल्या २३ प्रवाशांना दोन तास उशीर होणार होता. अशात तेथील एजंटने या प्रवाशांना निखिल ट्रॅव्हलच्या बसमध्ये कोंबले. दोन तास ताटकळत राहण्यापेक्षा लवकर घरी पोहोचता येईल, म्हणून या प्रवाशांनी त्यांना होकार दिला. अशात ५९ सीटची जागा असताना त्यात जास्तीच्या प्रवाशांना कोंबण्यात आले. यातील सात जणांना चक्क चालकाच्या बाजूच्या सीटवर बसविण्यात आले. या अपघातात या सात जणांसह १७ जणांचा मृत्यू झाला. ज्या प्रवाशांचे दुसऱ्या बसमध्ये बुकींग झाले होते.बस मालक संजय गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या गाडीवरचा चालक इक्बाल शेख हा अनुभवी असून उत्तम चालक आहे. गेल्या वर्षभरापासून माझ्याकडे काम करतोय. केवळ वाटेत उभ्या असलेल्या वाहनाला धक्का लागू नये, म्हणून त्याने गाडी दुसऱ्या दिशेने वळविली. आणि अपघात झाला असे त्यांचे म्हणणे आहे. ‘तो’चालकही कारवाईच्या कचाट्यातया अपघातात स्विफ्ट डिझायर कारचे मालक अमरजित दासयांची पत्नी कोमल गंभीर जखमी असून त्यांच्यावर मुलुंडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दास यांनी चुकीच्या पद्धतीने मध्येच गाडी उभी केली होती. त्यामुळे हा अपघात घडला. त्यामुळे त्यांच्या पत्नीची प्रकृती लक्षात घेऊन दास यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली.