पुणे : ब्रेक फेल झालेली पीएमपी झाडाला धडकून रस्त्याच्या कडेला पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकीवर आदळली. वर्दळीच्या जंगली महाराज रस्त्यावर भोसले आर्केडसमोर ही दुर्घटना घडली. हा प्रकार घडल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या गाडीमध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, गाडी आदळल्याने गाडीचा चालक जखमी झाला आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पीएमपीची बस क्रमांक एम. एच. १२ एच. बी. २५९ ही गाडी गुडलक चौकातून डेक्कनकडे जात असताना प्रयाग हॉस्पिटलजवळ गाडीचा ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर गाडी बँक आॅफ महाराष्ट्राच्या बाजूने घेतल्यास पुढे सिग्नलला इतर वाहने थांबली असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन चालकाने गाडी तशीच पुढे भोसले आर्केडच्या समोर पदपथावर घातली. मात्र, त्यानंतरही गाडी न थांबल्याने ही गाडी थेट रस्ता ओलांडून झेब्रा क्रॉसिंगवरून समोरील बाजूस असलेल्या पार्किंग केलेल्या एमएच १२ केजे ६४२२ या काळ्या रंगाच्या एका कारवर आदळून नंतर झाडाला आदळली.पीएमपीची बस गोखले चौकातून डेक्कनच्या दिशेने जात असताना गुरुवारी ब्रेक फेल झाल्याने ती झाडाजवळ उभ्या केलेल्या चारचाकी वाहनावर आदळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.>रस्त्यावर लागल्या वाहनांच्या रांगाभोसले आर्केडसमोर ज्या ठिकाणी झाडावर ही बस आदळली, त्या ठिकाणी सिग्नल तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग आहे. या सिग्नलवर सायंकाळी पाचनंतर दुचाकी वाहने तसेच रस्ता ओलांडणाऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. >ज्या वेळी ही बस दुभाजक ओलांडून पुढे गेली, त्या वेळी सिग्नल सुटल्याने जवळपास सर्वच वाहने पुढे गेलेली होती. त्यामुळे एकही दुचाकी अथवा इतर गाडीला त्याची धडक बसली नाही. त्यातच रोजच्या वर्दळीपेक्षा आज वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा वाहने सिग्नलला असताना ही बस रस्त्यावर घुसली असती तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले असते.
ब्रेकफेल पीएमपीचा डेक्कनला थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 12:46 AM