दापोली :
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचं कथित रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी खासदार निलेश राणे आज दापोलीत आहेत. त्यांनी दापोली पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही आणि रिसॉर्टकडेही जाऊ दिलं नाही. यावेळी सोमय्या, निलेश राणे यांचा पोलिसांसोबत चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. सोमय्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर सोमय्या आणि निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत चालतच परबांच्या कथित रिसॉर्टकडे निघाले होते. पण पोलिसांनी त्यांना अडवलं. याठिकाणी पोलीस आणि निलेश राणे यांच्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अखेर पोलिसांनी नीलेश राणे आणि सोमय्या यांना अटक केली आहे.
दापोलीत जमावबंदी पोलिसांकडून लागू करण्यात आली होती. या जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून नीलेश राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांना जिल्ह्याबाहेर सोडण्यात येणार आहे. पोलिसांनी आम्हाला अटक केली असून रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात येणार असल्याची माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. तसंच आमचा सत्याग्रह यशस्वी झाला असल्याचा दावा देखील सोमय्या यांनी यावेळी केला आहे.