पुणे : हे बजेट केवळ उद्योगक्षेत्राचे हित जपण्यासाठी तयार केले असून केंद्र सरकारने यात शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. ‘मेक इन इंडिया’च्या बाता मारणाऱ्या सरकारचे हे ‘ब्रेकिंग इंडिया’ बजेट आहे, अशी जळजळीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पुण्यात केली.संध्याकाळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले, ‘‘९ महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना भरपूर आश्वासने दिली होती. त्यामुळेच देशातील शेतकरी वर्गाने भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केले आणि सत्तापरिवर्तन घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. मोदींनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची वेळ आल्यावर मात्र सरकार मागे फिरले आहे. शेतमालाच्या उत्पादनाला खर्चाच्या तुलनेत किमान ५० टक्के अधिक किंमत देऊ, या निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनापासूनही मोदी घूमजाव करीत आहेत. या बजेटने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे.’’ देशात शेतीनंतर वस्त्रोद्योग सर्वांत मोठा आहे. त्याबाबत बजेटमध्ये एकही शब्द नसल्याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले. ‘‘दूध, ऊस, साखरेचा समस्या सुटलेल्या नाहीत. त्याच्या सोडवणुकीसाठी तरतूद अपेक्षित होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी योजना जाहीर करणे अपेक्षित असताना या बजेटमध्ये त्याबाबत साधा उल्लेखदेखील नाही. ठराविक लोकांसाठी हे बजेट जाहीर करून केंद्रसरकारने देशातील ६५ टक्के ग्रामीण जनतेच्या तोंडला पाने पुसली आहेत. हे बजेट केंद्र सरकारच्या आगामी कामगिरीची ब्लू प्रिंट आहे. शेतीच्या हिताची धोरणे न राबवणे ही शेतकऱ्यांशी प्रतारणा आहे, ’’ अशी टीका शेट्टी यांनी केली. पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या १४ आणि १५ तारखेला पुण्यात राज्यस्तरीय बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
हे तर ‘ब्रेकिंग इंडिया’ बजेट
By admin | Published: February 28, 2015 11:37 PM