मुंबई : भाजपाने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेची संधी दिली आहे. यामुळे शिवसेना काय पाऊल उचलणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
भाजपाने आज राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये हालचालींना वेग आला. तिन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठकांमध्ये पुढील रणनीती ठरविण्यात आली. शिवसेनेने आधी केंद्रातील सत्ता सोडावी मग प्रस्ताव पाठवावा अशी भुमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. तर राष्ट्रवादीने शिवसेना काय पाऊल उचलते याची वाट पाहण्याचे ठरविले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेला उद्या सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार की नाही हे कळविण्यास सांगितले आहे. यामुळे शिवसेनेकडे केवळ 56 जागा असताना कसे सरकार बनवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्रातील सत्तेतून बाहेर पडायचे की नाही याबाबतचा निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितल्याने पुढचे काही दिवस राज्यात मोठी समीकरणे जन्माला येणार आहेत.