Nawab Malik Bail plea: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या बेकायदेशीर कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज सुनावणी झाली.
तत्पूर्वी, न्यायालयाने २४ नोव्हेंबर रोजी निकाल सुनावणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्या दिवशी न्यायालयाने आदेश तयार नसल्याचे सांगत प्रकरणाची सुनावणी ३० नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. अंमलबजावणी संचालनालयाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मलिक यांनी जुलैमध्ये विशेष न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. गोवावाला कंपाउंड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे मलिक यांची जामिनासाठी धावाधाव गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर, नवाब मलिकांनाही जामीन मिळेल असा अंदाज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. पण आज झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांना जामीन नाकारण्यात आला.
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने मलिक यांना आज जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे मलिक यांचा कारागृहातील मुक्काम आता कायम राहणार आहे.