कांदे व केळीचे आगर असलेल्या उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून पै-पै भांडवल गोळा करून पाच-सहा दशकांपूर्वी सुरू झालेले अनेक सहकारी साखर कारखाने आज गैरव्यस्थापनामुळे मोडीत निघाले आहेत. कर्जाचा वाढता बोजा, शेतकऱ्यांची देणी थकविणे, कामगारांचे अडकलेले पगार अशा एक ना अनेक प्रकारांनी कारखाने बंद पडले आहेत. कारखानदारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
नाशिक : बहुतांश कारखाने अडचणीतनाशिक जिल्ह्यातील ७ साखर कारखान्यांपैकी केवळ दोन सहकारी आणि एका खासगी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून, चुकीचे नियोजन, भ्रष्टाचार आणि वाढता कर्जाचा बोजा यामुळे इतर सर्व कारखाने मागील दहा-बारा वर्षांपासून बंद आहेत. उसाचे आगर असलेल्या निफाड तालुक्यात रासाका आणि निसाका हे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला निसाका १२ वर्षांपासून बंद असून, कर्जाच्या बोजामुळे मालमत्ता विकण्याची नामुश्की ओढावली आहे. दोन वर्षांपासून बंद असलेला रासाका कारखाना सुरू करण्यासाठी सध्या निविदा काढण्यात आली आहे. वसाका कारखान्याचा मागील वर्षी गळीत हंगाम झाला नाही. गिरणा सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद पडला आहे. नाशिक सहकारी साखर कारखानाही बंद असून, जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई केली आहे.
धुळे : ऊस शहाद्यासह बडवानीकडे धुळे जिल्ह्यातील चार सहकारी साखर कारखाने कर्जबाजारीपणामुळे बंद पडले आहेत. शेतकऱ्यांना नाशिक, शहादा आणि मध्य प्रदेशातील बडवाणीत ऊस विकावा लागतो.शिरपूर सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेच्या ३५ कोटींच्या थकीत कर्जामुळे बंद आहे. पांझरा-कान सहकारी साखर कारखाना विक्रीची शिखर बँकेने फेरनिविदा काढली आहे. संजय साखर कारखाना विकला गेला आहे, तर शिंदखेडा सहकारी साखर कारखाना सुरूच झालेला नाही.
जळगाव : चारपैकी एकच कारखाना सुरूजळगाव जिल्ह्यातीत चार साखर कारखान्यांपैकी मुक्ताईनगरचा एकमेव कारखाना सुरू आहे. मधुकर, बेलगंगा व चोसाका बंद आहेत. सलग दुसरा गळीत हंगाम बंद ठेवण्याची वेळ मधुकरवर आली आहे. जिल्हा बँकेचे कर्ज, ४८ महिन्यांचे कामगारांचे वेतन, एफआरपी रक्कम थकली आहे. चोपडा कारखाना तीन वर्षांपासून बंद आहे. कामगारांचे ४० महिन्यांचे वेतन थकीत आहे. लोकसहभागातून ६५ कोटी रुपये उभे करून बेलगंगा कारखाना सुरू झाला, पुन्हा बंद झाला.
अहमदनगर : देणी थकविल्याने दोन कारखाने बंदमागील वर्षीची शेतकऱ्यांची देणी न दिल्याने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचा श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा-२ साखर कारखाना, तर दिवंगत डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बंदच आहे. जिल्ह्यात एकूण २३ साखर कारखाने आहेत. यापैकी सहकारी १४ तर खासगी साखर कारखाने ९ आहेत. साईकृपा-२ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ७ कोटी, तर तनपुरे कारखान्याने २ कोटी ३८ लाख रुपये थकविले आहेत. तनपुरे साखर कारखाना खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अधिपत्याखाली आहे. तनपुरे कारखान्याच्या व्यवस्थापनाने चालू वर्षी गाळप सुरू करण्याची परवानगी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाकडे मागितली हाेती; परंतु शेतकऱ्यांची देणी थकविल्याने साखर आयुक्तांनी परवानगी दिली नाही.
(संकलन : संजय दुनबळे, अण्णा नवथर, राजेंद्र शर्मा, हितेंद्र काळुंखे)