Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena: महाराष्ट्रात सुरू असलेला शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट हा शिवसेनेतील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. या प्रकरणी विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता न्या.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायमूर्तींचे घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी हे पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ गठन केले आहे. यात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. नरसिंहा यांचा समावेश आहे.
'शिवसेना नक्की कोणाची?', या वादाबद्दल शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरात लवकर निर्णयाची अपेक्षा असल्याने, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाने केली होती. निवडणूक आयोगावरील सुनावणीसाठी टाकलेले निर्बंध काढून टाकावेत, अशी विनंती करणारी याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याचीही मागणी शिंदे गटाकडून कऱण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत उदय लळीत यांनी सूचक संकेत दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्णय देण्याची घाई करू नये, अशी विनंती केली होती. पण निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे कोर्टाने आदेश द्यावेत, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. इतर प्रकरणांवरील सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. मात्र कोर्टाच्या निर्णयाआधीच शिवसेना पक्षाविषयीचा निर्णय लावण्यात यावा असे शिंदे गटाचे मत आहे. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. या प्रकरणी २५ ऑगस्ट रोजी घटनापीठ स्थापन होणार होते, अखेर ते स्थापन झाले.