राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी आज निकाल जाहीर केला. बहुमताला महत्व देत राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचे सांगितले. तसेच पक्षात मतभेद असतात, ते अंतर्गतच सोडवायचे असतात असे सांगत दोन्ही बाजुचे आमदार अपात्र नाहीत असा निर्णय दिला आहे. याचबरोबर शरद पवार गटाच्या तीन याचिका फेटाळल्या आहेत. यावर सुप्रिया सुळे यांचा प्रतिक्रिया आली आहे.
हा कॉपी पेस्ट निकाल आहे. शिवसेनेचे नाव बदलून राष्ट्रवादीचे दिले आहे. स्थानिक पक्षांची गळचेपी सुरु आहे. भाजपाला कोणताही स्थानिक पक्ष मोठा होताना पहावत नाही. यामुळे आयकर, सीबीआय, ईडीला मागे लावायचे आणि गळचेपी करायची हा प्रकार सुरु आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
अदृष्य शक्तीच्या आदेशावरून निकाल देण्यात आला आहे. कायदे नियम, संविधान मोडून काम सुरु आहे. राहुल नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार, असा आरोप सुळे यांनी केला आहे. मी निकाल वाचन पाहिले नाही. कारण शिवसेनेवेळी पाहिले होते. यामुळे मला हे अपेक्षितच होते, असेही सुळे म्हणाल्या.
पक्ष कोणाचा? निकाल काय...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचा संदर्भ देत आणि आमदारांच्या संख्याबळातील बहुसंख्येच्या आधारे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यामध्ये, पक्षाचे स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील आकलन व नेतेपदाची संरचना लक्षात घेण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवारा गटाला बहुमत स्वीकारलं जात नाही, असे नार्वेकर यांनी म्हटलं.तसेच, मूळ पक्ष हा विधिमंडळ बहुमतावर ठरणार असल्याचे सांगत अजित पवार गटाला ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याने अध्यक्षांनी हा निर्णय दिला