- प्रकाश काळे वैभववाडी(सिंधुदुर्ग): आठवडाभर कोसळणा-या पावसामुळे करुळ घाटातील संरक्षक कठडा ढासळून रस्त्यालगत भगदाड पडले आहे. त्यामुळे भगदाडाभोवती मातीचे ढिगारे ओतून घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना हाती न घेतल्यास रस्ता खचून वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.करुळ घाटातील 'यू' आकाराच्या वळणाच्या अलिकडे सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील दगडी बांधकाम असलेला संरक्षक कठडा अतिवृष्टीमुळे शनिवारी दुपारी ढासळला. त्यामुळे रस्त्यालगत भगदाड पडले आहे. कठडा ढासळून भगदाड पडल्याचे कळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचे ढिगारे ओतून खचलेला भाग संरक्षित केला आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे.भगदाड पडलेल्या ठिकाणी खोल दरी असून त्या भागात सद्या दिवसरात्र दाट धुके असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. अन्यथा पावसामुळे रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास करुळ घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत. ढासळलेल्या कठड्याच्या जागी भगदाड वाढू नये याची खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभाग कशा प्रकारे घेणार हे पाहावे लागणार आहे.
करुळ घाटात संरक्षक कठडा ढासळून रस्त्यालगत भगदाड; एकेरी वाहतूक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 12:30 AM