लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्याप्रकरणी शासनाने नियुक्ती केलेल्या समितीची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशीचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे, अशी माहिती शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सोमवारी दिली. पुढील आठवड्यात अंतिम अहवाल सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. म्हैसाळमधील खिद्रापुरे याच्या भारती रुग्णालयाच्या विविध प्रकारच्या बेकायदेशीर नोंदी, तसेच त्याने नेमके काय केले, याचा समितीने अभ्यास केला. अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटनांसाठी कारणीभूत असलेल्या शासकीय यंत्रणेमधील दोष समितीने शोधले आहेत. या घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, हेही शासनाला सुचविले आहे. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे यांच्या मृत्यूबाबत तांत्रिक बाबी, तसेच गर्भपातासाठी वापरली गेलेली औषधे कोठून आणली जात होती, खिद्रापुरेकडे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नसतानाही, त्याला ही औषधे कशी काय देण्यात आली, याचीही समितीने चौकशी केली आहे. गर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह १२ जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील खिद्रापुरेसह सहा जणांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होऊन सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. न्यायालयाने १७ पर्यंत (बुधवार) जामिनावरील निर्णय राखून ठेवला आहे. सात जणांची समितीअधिष्ठात्यांसह याच रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील महिला प्राध्यापिका, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त व ‘युनिसेफ’चे पुण्याचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मधुसूदन कर्नाटकी हे या समितीचे सदस्य आहेत. जिल्हाधिकारी समितीचे सदस्य सचिव आहेत.
म्हैसाळ भ्रूणहत्याकांडाची चौकशी पूर्ण
By admin | Published: May 16, 2017 2:15 AM