स्नेहा मोरे / लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अँजिओप्लास्टी करण्याकरिता वापरण्यात येणारे स्टेंटचे दर गगनाला भिडले होते. या सर्वात लूटमारीचा प्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. नुकतेच राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने देशभरातील सर्व रुग्णालयांना स्टेंटविषयी विशेष निर्देश दिले आहेत. त्यात रुग्णालयाने स्टेंटचे प्रकार, ब्रँड, उत्पादक, किंमत याची माहिती रुग्णालय आवारात लावावी, तसेच रुग्णालयाच्या बिलात स्टेंटच्या प्रकाराचा, किमतीचा स्पष्ट उल्लेख असावा, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशांच्या अंमलबजावणीवर आता अन्न व औषध प्रशासन भर देत असून, त्यांचे यावर विशेष लक्ष आहे.राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशांमध्ये रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागात स्टेंटच्या किमतीचे फलक लावण्यात यावेत, जेणेकरून लोकांना त्वरित याविषयी माहिती मिळेल, तसेच रुग्णालय प्रशासनाकडून योग्य दर आणि उत्तम दर्जाचे स्टेंट रुग्णांना पुरविण्यात यावे. याखेरीज रुग्णालयांच्या संकेतस्थळावर ‘होमपेज’वरही स्टेंटविषयी इत्थंभूत माहिती देण्यात यावी. प्राधिकरणांच्या सूचनांनंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने या निर्देशांचे पालन रुग्णालये करत आहे की नाहीत, यावर लक्ष ठेवणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याविषयी डॉ. दराडे यांनी सांगितले की, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाच्या निर्देशानंतर, याविषयी अन्न व औषध विभागानेही परिपत्रक काढले आहे.
बिलात स्टेंटच्या किमती, ब्रँडचा उल्लेख करा, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:25 AM