लोणार (जि. बुलडाणा) : सरोवराच्या चारही बाजूने १00 मीटरचा परिसर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाद्वारे नुकताच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित केला; मात्र सरोवरापासून काही मीटर अंतरावर वन्यजीव अभयारण्य परिसरात गावठी दारूची भट्टी मांडण्यात आली आहे. या भट्टीतून अनेक दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर गावठी दारू तयार करून ती विक्री होत असल्याचे वास्तव १४ मार्च रोजी ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. येथील निसर्गनिर्मित खार्या पाण्याच्या लोणार सरोवराचे आणि वन्य जीव अभयारण्याच्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने शासन स्तरावरून मोठे पाऊल उचलले जाते; मात्र ज्या विभागावर वन व पर्यावरण संरक्षणाची मुख्य जबाबदारी आहे, त्याच वनविभागाकडून पर्यावरणास हानी पोहोचविणार्या या गावठी दारूच्या भट्टीकडे सर्रास डोळेझाक केली जाते. या परिसरात अनेक दिवसांपासून गावठी दारू निर्मिती करण्याच्या भट्टी लावण्यात आल्या असून, त्याचा वन्य जीव अभयारण्यासह खार्या पाण्याच्या सरोवराला धोका निर्माण झाला आहे. या हातभट्टीत तयार केलेली दारू रात्रीच्या वेळी वितरित केली जाते. दुर्लक्षित असलेल्या मार्गावर या हातभट्टी सुरू असते. लोणार सरोवर आणि वन्य जीव अभयारण्याचे पर्यावरणदृष्ट्या संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी वन विभागाची असताना या परिसरात गावठी दारू निर्माण करणार्या हातभट्टय़ा लागल्या तरी कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण लोणार सरोवराचे जतन आणि संवर्धनासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून १00 मीटर परिसर इकोसेन्सिटीव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे या परिसरात नियमानुसार नवीन खोदकाम अथवा बांधकाम करता येत नाही; मात्र गावठी दारू बनविणार्या हातभट्टय़ा कशा लागल्या, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. असे केले स्टिंग ऑपरेशनलोकमत चमू १४ मार्च रोजी दुपारी ३.३0 वाजता गुपित कमळजा मातेच्या दर्शनासाठी जात असताना सरोवरापासून ५0 मीटर अंतरावर परिसरातील झुडुपामध्ये गावठी दारूच्या हा तभट्यांचा धूर दिसला, तसेच दारूच्या मोहा सडव्याचा वास आला. त्या वासावरून दारू अड्ड्याच्या ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता, तेथे दारू, मोहा सडव्याचे दोन टँक, दारूचे बॅरल, पाण्याची टाकी, दारू भट्टी आदी आढळून आले; मात्र दारू काढणारे इसम त्याठिकाणी नव्हते.वन्य जीव अभयारण्यात गावठी दारू निर्माण करणार्या हातभट्टय़ांमुळे परिसरात दुर्गंंधी पसरली आहे. याचा पशु-पक्ष्यांवर विपरित परिणाम होत आहे. गावठी दारू निर्मिती करताना त्यातून निघणारा मोहा सडव्याचे भरलेले ड्रम या परिसरात आढळून येतात. या ठिकाणी चालतो दारू अड्डा सरोवराच्या दक्षिण दिशेला व गुपित कमळजा मातेच्या मंदिराजवळील वन्य जीव अभयारण्याच्या परिसरातील घनदाट झाडीत हा दारू अड्डा चालत असल्याचे दिसून आले; मात्र या परिसरात वन विभागाचे कर्मचारी फिरकत नसल्याने दारू अड्डाचालकांना अभय मिळत आहे.
सरोवर परिसरातच दारू भट्टी!
By admin | Published: March 15, 2016 2:18 AM