अनसिंग/नांदुरा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने वाशिम जिल्ह्यातील अनसिंग व बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा येथे कारवाई करुन लाचखोर हवालदार व पंचायत समिती कृषी अधिकार्याला अटक केली. वाशिम तालुक्यातील अनसिंग पोलिस स्टेशनमधील कार्यरत पोलिस जमादार नंदू राठोड याला कर्तव्यावर असताना तक्रारदाराकडून १0 हजाराची लाच घेताना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी दुपारी ५ वाजताचे सुमारास घडली. येथील तक्रारदार नंदकिशोर लक्ष्मीनारायण सोमाणी यांची सावळी शिवारात शेती आहे. या शेतीच्या ताब्याबद्दल तक्रारदाराचे वडील व त्याच्या काकामध्ये वाद सुरू आहेत. न्यायालयाने या शेताचा ताबा तक्रारदाराच्या वडीलांना दिला आहे. त्या शेतामध्ये टीनपत्राचे शेड होते. या शेडचे तीन टीनपत्रे, सिमेंट पोल आणि लोखंडी अँगल असा एकुण ३५ हजाराचा माल आरोपी चंदु धर्मा राठोड अधिक १७ जणांनी ४ एप्रिल २0१४ ते ५ एप्रिल २0१४ चे रात्री चोरून नेला. त्याबद्दल २६ जुन रोजी अनसिंग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास जमादार नंदु राठोठ यांचेकडे होता. या गुन्ह्याचा तपास करणे व आरोपी अटक करून माल जप्त करण्यासाठी आरोपी जमादार नंदु राठोड याने नंदकिशोर सोमाणी यास १0 हजार रूपयाची मागणी केली. मंगळवारी अनसिंग पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्विकारताना जमादार नंदु राठोड यास अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
** कृषी अधिकार्याला रंगेहात पकडले
नांदूरा येथील पंचायत समितीचे कृषी अधिकारी गणेश लोखंडे याला आज ८ जुलै रोजी दुपारी कृषी केंद्राचा परवाना नुतनीकरणासाठी ३ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाच्या पथकाने रंगेहात पकडले व गुन्ह्याची नोंद करून अटक केली. येथील पंचायत समितीचे कृषी अधिकारी गणेश लोखंडे यांनी श्रीलक्ष्मी कृषी केंद्राचे मालक गोपाल सहदेव दळवी रा.निमगाव यांना त्यांच्या कृषी केंद्रावर कारवाई करू नये व नारखेड येथे नवीन कृषी केंद्राच्या परवान्यासाठी तीन हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार गोपाल दळवी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्याकडे ७ जुलै रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. त्यानुसार ८ जुलैच्या दुपारी पंचायत समिती कृषी अधिकारी गणेश लोखंडे यांना उस्मानिया चौकातील श्रीराम कृषी केंद्रात पंचासमक्ष ठरल्याप्रमाणे तीन हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक तडवी, पोलीस उपअधिक्षक एस.एल. मुंढे, भांगे, शेकोकार, गडाख, शेळके, ठाकरे, चोपडे, ढोकणे, सोळंके, राजनकर, यादव, वारूळे आदींच्या पथकाने केली.