मुंबई : भष्ट्राचाराच्या आरोपामुळे महसूलमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागलेले भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा कथित स्वीय सहाय्यक (पीए) गजानन पाटील याने ३० कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र सुमारे १०५० पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे यांचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील सक्रीय कार्यकर्ता व त्यांचा पीए म्हणून मंत्रालयात वावरणाऱ्या गजानन पाटील याला एसीबीने १४ मे रोजी अटक केली होती. ठाण्यातील मागासवर्गियांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासाठी त्यांने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल ३० कोटीची मागणी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत विश्वस्त डॉ.रमेश जाधव यांनी तक्रार केल्यानंतर एसीबीने सापळा रचून गजानन पाटीलला तत्कालीन महसूल मंत्री खडसे यांच्या मंत्रालयातील दालनातून अटक केली होती. त्यामुळे खडसे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर पुणे आणि जळगावात भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचे तसेच खडसे यांना अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याचा कराचीतून फोन आल्याचे आरोप झाले. त्यामुळे सर्वस्तरावरुन टीकेचा भडीमार झाल्याने खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर या प्रकरणांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. (प्रतिनिधी)महसूल मंत्र्यांच्या दालनाचा उल्लेख नाहीगजानन पाटील याला एसीबीने तत्कालीन महसूलमंत्री खडसे यांच्या मंत्रालयातील दालनातून अटक केली होती. त्यावेळच्या त्यांच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये तसे नमूद केले होते. शनिवारी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये मात्र त्या ठिकाणाचा उल्लेख टाळण्यात आला असून पाटीलला मंत्रालयातून अटक करण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे खडसे यांच्यापासून हे प्रकरण पूर्णपणे बाजूला राहिले आहे. पाटील याने आपण केवळ गंमत म्हणून लाच मागितली होती, अशी कबुली जबाबात दिल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे.
लाचप्रकरण आरोपपत्र; खडसेंचे नावच नाही
By admin | Published: July 17, 2016 12:12 AM