वाशिम: अनुदानित शाळेत इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना कारंजा येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक व लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी शाळेच्या आवारात रंगेहात पकडले. अरविंद नवलसंगई कस्तुरीवाले व सुदीप सूर्यकांत मिश्रीकोटकर अशी लाच घेणार्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली. कारंजा (लाड) येथील महावीर ब्रम्हचर्य आश्रम हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याला पाचवीत प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापक व लिपिकाने पाच हजारांची मागणी केली होती. या अनुषंगाने तक्रारदार पालकाने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयामध्ये ३ जून रोजी रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांनी त्यांच्या पथकासह बुधवारी दुपारी महावीर ब्रम्हचर्य हायस्कूलच्या आवारात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून मुख्याध्यापक अरविंद नवलसंगई कस्तुरीवाले व लिपिक सुदीप सूर्यकांत मिश्रीकोटकर या दोघांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक (एसीबी) गांगुर्डे यांनी दोघांनाही ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७, १३, (१) (ड) सहकलम १३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचखोर मुख्याध्यापक, लिपिक अटकेत
By admin | Published: June 23, 2016 12:14 AM