पवनी (भंडारा) : एलईडी पथदिव्यांचे थकीत बिल काढण्यासाठी लाचेपोटी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना पवनी नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंत्याला शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले.दलित वस्ती योजनेअंतर्गत २०१५मध्ये पवनी शहरातील प्रभाग क्र. एक व दोनमध्ये एलईडी पथदिवे लावण्याचे काम पूर्ण झाले. हे कंत्राट घेणाऱ्या इलेक्ट्रीकल वर्क्सला पहिल्या टप्प्यात १ कोटी २० लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले. उर्वरित १४ लाख रुपयांचे बिल डिसेंबर २०१५पासून थकीत होते. हे बिल काढण्याकरिता पवनी नगर परिषदेचे कनिष्ठ अभियंता आनंद बांडेबुचे हा टाळाटाळ करीत होता. त्याने त्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. संबंधित कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना आनंद बांडेबुचे याला रंगेहाथ अटक केली. (प्रतिनिधी)
लाचखोर कनिष्ठ अभियंता गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2017 2:02 AM