न्यायालय : अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रकरणनागपूर : लाचेच्या सापळ्यात २५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्या गेलेल्या अतिरिक्त विभागीय आयुक्त एस. जी. गौतम यांच्या कार्यालयातील सहायक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एम. लालवाणी यांच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी केली. टिना सुरेश साजिदा ऊर्फ टिना ठाकुर (२६) रा. जरीपटका, असे या महिलेचे नाव आहे. रामटेकनजीकच्या काचूरवाही येथील शेतकरी वामन झिंगर सहारे यांचा आपला भाऊ शिवराम सहारे याच्यासोबत शेतजमिनीच्या मालकी हक्काचा वाद गौतम यांच्यापुढे सुरू होता. निकाल वामन सहारे यांच्यावतीने लावण्यासाठी टिनाने त्यांना ४० हजाराची लाच मागितली होती. २५ हजार रुपये आधी आणि उर्वरित १५ हजार रुपये निकाल लागल्यावर देण्याचे ठरले होते. या कार्यालयाच्या बाहेरील एटीएमनजीक २५ हजाराची लाच घेताना बुधवारी तिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. आज एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला न्यायालयात हजर करून थेट न्यायालयीन कोठडी रिमांडची मागणी केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपीच्या वकिलाने जामीन अर्ज सादर केला. न्यायालयाने अर्जावर सरकारी वकिलाचे उत्तर मागितले. त्यांनी उत्तर दाखल करण्यास उद्या शुक्रवारपर्यंत वेळ मागितला. तो न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे उद्या या महिलेच्या जामिनावर सुनावणी होईल. तोपर्यंत तिची कारागृहाकडे रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे तर आरोपीच्या वतीने अॅड. विलास डोंगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)गौैतम करमणूक कर शाखेतविभागीय आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार काढून घेतल्याने उपायुक्त एस.जी.गौतम करमणूक कर शाखेत त्यांच्या मूळ पदावर रुजू झाले आहेत. गौतम करमणूक शाखेचे उपायुक्त आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त आणि अलीकडेच पुनर्वसन या दोन विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. अतिरिक्त आयुक्तांच्याच कक्षातून गौतम त्यांचे कामकाज करीत होते. बुधवारी त्यांच्या कंत्राटी स्वीय सहायिकेला लाच घेताना पकडल्याने विभागीय आयुक्तांनी त्यांच्याकडून अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार काढून घेतला. त्यामुळे गुरुवारी या कक्षाला कुलूप होते. गौतम यांना करमणूक कर शाखेत नवीन कक्ष देण्यात आला आहे.
लाचखोर महिला कारागृहात
By admin | Published: July 25, 2014 12:46 AM