ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १६ - येत्या 15 व 16 आॅक्टोबर रोजी गोव्यात ब्रिक्स परिषद होणार आहे. त्यानिमित्ताने 14 आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी ही माहिती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. भारतासह ब्राझिल, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका हे देश परिषदेत भाग घेणार आहेत.
ब्रिक्स परिषदेनिमित्तच्या तयारीचा आपण सर्व खात्यांकडून मंगळवारी आढावा घेतला. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाचे एक पथक व स्वतंत्र ब्रिक्स खातेही स्थापन करण्यात आले आहे असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगितले.
चिनचे राष्ट्राध्यक्ष ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील. दक्षिण गोव्यातील चार पंचतारांकित हॉटेल्स त्यासाठी आरक्षित करण्यात आली आहेत. चार इस्पितळे ब्रीक्स परिषदेप्रसंगी शस्त्रक्रिया विभागासह सज्ज ठेवली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संरक्षण खात्याची उडती रुग्णवाहिका महनीय व्यक्तींसाठी वापरली जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव सारी उपाययोजना सुरू आहे. केंद्रातूनही प्रसंगी सुरक्षा व्यवस्था मागविली जाईल. आम्हाला या परिषदेच्या आयोजनाच्या आव्हानाचे रुपांतर संधीत करायचे आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने ब्रिक्सचा आम्हाला मोठा लाभ होईल असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)