सांगली – कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील नववधूचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वऱ्हाडी मंडळीसह हळदी, कुंकू कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना क्वारंटाईन करावं लागले. भिकवडी खुर्द येथे झालेल्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या, तसेच लग्नांतर या नववधूच्या संपर्कात आलेल्या सोहोली येथील ३२ तर भिकवडी येथील ५४ अशा एकूण ८६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
२८ जून रोजी भिकवडी खुर्द येथील मुलीचा सोहोली येथील मुलाबरोबर भिकवडीत लग्नसोहळा पार पडला. संचारबंदीमुळे ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. विवाहानंतर ११ जुलै रोजी नवरी मुलीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, यामुळे प्रशासनाने लग्नाला उपस्थित असलेल्या सोहोली येथील वऱ्हाडी मंडळींना व भिकवडी येथील उपस्थितांना होम क्वारंटाईन केले होते, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील भिकवडी येथील १० जणांना कडेगाव येथील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
तसेच मृत व्यक्तीच्या सदाशिवगड(कराड) येथील जावयाचा कोरोना चाचणी अहवाल ९ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला, जावई भिकवडी येथे मेव्हणीच्या लग्नाला आले होते, तसेच ७ जुलै रोजीही सासूरवाडीला येऊन गेले होते, दरम्यान, लग्नानंतर सोहोली येथे सासरी गेलेली नवरी मुलगी २ जुलै रोजी माहेरी भिकवडी येथे आली होती. यानंतर ५ जुलै रोजी पुन्हा सोहोली येथे सासरी गेली, ११ जुलै रोजी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भिकवडी येथील कुटुंबीयांसह नवरी मुलीलाही क्वारंटाईन केले होते. १४ जुलै रोजी मृत व्यक्तीचे आईवडील, पत्नी, दोन वर्षाचा नातू, भाऊ व भावजय अशा सहा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.
यानंतर शनिवारी १८ जुलैला भिकवडी येथील मृत व्यक्तीची मुलगी, तसेच सोहोली येथे सासरी गेलेली नववधू व सदाशिवगड येथील मुलगी तसेच पुतणी अशा चौघींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. नववधूच्या पतीचा कोरोना चाचणी अहवाल काही दिवसांपूर्वी निगेटिव्ह आला आहे.
वऱ्हाडी मंडळींचा धोका टळला
२८ जून रोजी झालेल्या लग्नाला उपस्थित लोकांना होम क्वारंटाईन केले आहे, मात्र आता लग्नाला २० दिवस झाले आहेत. यामुळे उपस्थितांमधील कोणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता नाही, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
प्रशासन सतर्क
संबंधित नवविवाहितेच्या वडिलांचा ११ जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रशासन सोहोली व भिकवडी खुर्दमध्ये सर्व त्या उपाययोजना राबवत आहे. घरोघरी सर्वेक्षण सुरु आहे, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.