अकोला : राजस्थानच्या युवकासोबत सात फेरे घेतल्यानंतर भर लग्नसोहळ्यातून नवरी व तिचे नातेवाईक ५० हजार रुपये घेऊन पसार झाल्याचा खळबळजनक प्रकार येथील रिधोरा गावाजवळ सोमवारी दुपारी घडला. फसवणूक झालेल्या युवकाच्या तक्रारीची बाळापूर पोलिसांनी नोंद केली आहे.राजस्थानमधील एका ३० वर्षीय युवकाला अकोल्यातील एका मध्यस्थामार्फत स्थळ चालून आले. लग्नासाठी मुलीकडच्या लोकांना खर्चासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे या युवकाला सांगण्यात आले होते. सोमवारी संबंधित युवक अकोल्यात आल्यावर त्याला खदान परिसरातील एक युवती मध्यस्थाने दाखविली. मुलगी पसंत आल्यावर मध्यस्थाने लग्न उरकून घेण्याची घाई केली. युवकही बोहल्यावर चढण्यास चटकन तयार झाला.मध्यस्थ, युवती आणि तिच्या काही नातेवाईकांनी रिधोरा येथील एका मंदिरामध्ये सोमवारीच लग्न लावण्याची तयारी दर्शविल्यानंतर सर्व जण मंदिरात आले.फसवणूक करणारी टोळी सक्रियलग्नासाठी इच्छुक परप्रांतीय युवकांना हेरून त्यांना मुली दाखविण्यात येतात आणि बनावट लग्न लावून युवकांकडून लाखो रुपये उकळले जातात. नंतर काहीतरी कारण सांगून मुलीसह तिचे सहकारीसुद्धा पैसे घेऊन गायब होतात. यापूर्वी अकोल्यात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांवरून अकोल्यात बनावट लग्न लावून फसवणूक करणारी एक टोळीच सक्रिय असल्याचे स्पष्ट होते.- ‘नवरी सासरी रवाना होण्यापूर्वी आम्ही तिची नातेवाईकांशी भेट घडवून आणतो,’ असे नातेवाईकांनी नवरदेवाला सांगितले. त्यानंतर नवरीसह तिचे नातेवाईक निघून गेले. काही वेळातच मध्यस्थही पसार झाला.
मांडवातून नववधू पैसे घेऊन पसार; अकोल्यातील धक्कादायक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 2:18 AM