Brij Bhushan Sharan Singh: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपला पूर्वनियोजित अयोध्या दौरा रद्द केला. केवळ प्रकृतीचे कारण नाही, तर हा एक सापळा असून, महाराष्ट्रातूनच त्याला रसद पुरविली जात असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्याची कारणे विषद केली. यानंतर आता मनसेकडून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडवा विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) एकत्र दिसत आहेत. यासंदर्भात बृजभूषण सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आक्रमकपणे विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मगच अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी भूमिका बृहभूषण सिंह यांची होती आणि ते त्यावर अद्यापही ठाम आहेत. यातच मनसेने जारी केलेल्या फोटोबाबत बोलताना, होय, शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. याचा मला अभिमान आहे. आजही शरद पवार अयोध्येत आले, तर मी त्यांना प्रमाण करेन. माझ्यासाठी ते एक चांगले नेते आहेत. राज ठाकरे यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे, असे सिंह यांनी नमूद केले.
शरद पवार देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत
शरद पवार हे देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. मी कुस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि शरद पवार हे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे संरक्षक आहेत. हा कार्यक्रम तीन वर्षांपूर्वी पुण्यात झाला होता. कुठलाही कार्यक्रम असला, तरी ते पहिल्यांदा माझा सत्कार करायचे. मला माळा घालायचे. सत्काराचा एकही हार स्वतः त्यांनी कधी घालून घेतला नाही. कुस्ती क्षेत्रात जे काम झाले, ते माझ्यामुळे झाले, अशी भावना शरद पवार यांची आहे. सुशील कुमारचे ऑलिम्पिक मेडल असो किंवा योगेश्वर दत्त यांची कामगिरी, यामध्ये आमचा मोठा वाटा आहे, असे सिंह यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, मनसे नेते सचिन मोरे यांनी शेअर केलेला फोटो एका कार्यक्रमातील आहे. याच कार्यक्रमात बृजभूषण सिंह यांच्यासह शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याही दिसत आहेत. सचिन मोरे यांनी शेअर केलेल्या या फोटोला कुछ फोटो अच्छे भी होते है, और सच्चे भी होते है, असे कॅप्शन दिले आहे. सचिन मोरे यांनी बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केले असून, याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो एका कुस्ती स्पर्धेतीलच असल्याचे दिसत आहे. सन्मान लाल मातीचा, बहुमान मावळवासियांचा, असे या फोटोतील बॅनरवर लिहिलेले दिसत आहे.