नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ७ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर तीन दिवसीय भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या महोत्सवाचा सांगता सोहळा पार पडला असून यामध्ये सहभागी कलाकारांचा गुणगौरव करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत या महोत्सवाला तीन दिवसांमध्ये असंख्य नागरिकांनी भेट दिली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त या भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होत. कदम यांनीही या महोत्सवाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. संस्कृती, परंपरा, बोलीभाषा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा यामध्ये विविधता असूनही एकात्मता कशी साधता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारत महोत्सव अशा शब्दात कदम यांनी या महोत्सवाची स्तुती केली. यावेळी आशियातील सर्वात जलद चित्र रेखाटणारा चित्रकार अशी ख्याती असलेल्या विलास नायक यांनी या महोत्सवात प्रात्यक्षिक सादर केले. या महोत्सवाच्या महिनाभर आधीपासून शहर स्वच्छतेवर भर देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. सोसायट्यांमध्ये राबविले जाणारे उपक्रम, स्वच्छता, पर्यावरण आदींचे परीक्षण करून तीन उत्कृष्ट सोसायट्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. यामध्ये ऐरोली सेक्टर २९ परिसरातील विजयदीप सोसायटीने प्रथम क्रमांक पटकाविला, सेक्टर २९ परिसरातील गायत्रीधाम सोसायटी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तिसरा क्रमांक सेक्टर ३० परिसरातील कृष्णकुंज सोसायटीने पटकाविला. गोठीवली गावातील विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाचाही याठिकाणी सत्कार करण्यात आला. या महोत्सवात वसईतील जुचंद्र येथील रांगोळी कलाकार तसेच शिल्पकारांनीही कलांचे प्रात्यक्षिक सादर केले. रुद्राक्ष डान्स अकादमीच्या वतीने या महोत्सवात नृत्याविष्कार सादर करण्यात आले. लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना पैठणी तर पुरुषांना सफारींचे वितरण करण्यात आले. महोत्सवादरम्यान महिलावर्गासाठी राबविण्यात आलेल्या पाककृती स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक एम.के. मढवी, नगरसेविका पूनम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. >माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे आणि ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. स्थानिक कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच नवी मुंबईकरांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली. सर्वच क्षेत्रातील कलाकारांनी या महोत्सवाला हजेरी लावली.
ऐरोलीतील भारत महोत्सवाची शानदार सांगता
By admin | Published: January 17, 2017 3:20 AM