गडचिरोली - आम्ही विनम्रपणे लोकांकडे जातो, हे मात्र ‘उखाड देंगे, फेक देंगे’ म्हणत गुंडांची भाषा वापरतात. हे उन्मत्त सरकार आता पत्रकार, साहित्यिकांच्या लिखाणावही बंदी घालत आहे, ही लोकशाही नाही तर ठोकशाही आहे. ठोकशाहीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता काजीब करण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आमचे सरकार आणा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान रविवारी (दि.१३) गडचिरोलीत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी खा.चव्हाण म्हणाले, जेवढी कामे काँग्रेसच्या कार्यकाळात झाली तेवढी कोणीच केली नाहीत. उलट आमच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामे हळूहळू ठप्प पडली. गडचिरोली जिल्ह्यातल्या सुरजागडमधील लोहखनिज दुसºया जिल्ह्यात जात आहे. स्थानिक लोक मात्र रोजगारात मागे पडत आहेत. मात्र या सरकारला त्याची काळजी नाही. आदिवासींना आरोग्य सुविधा मिळत नाही. कुपोषणाने मुलं मरत असताना यांचे मंत्री उन्मत्तपणे ‘मरता है तो मरने दो’ म्हणतात. दारूबंदीच्या जिल्ह्यात भाजपचेच दारू आणि वाळू माफिया फोफावले आहेत. सिंचनाची कामे रखडली, कर्जमाफी जाचक अटींमध्ये अडकवून ठेवली. गडचिरोलीत तर ‘पालकमंत्री शोधून काढा, १००० रुपये मिळवा’ अशी स्थिती झाली आहे. भाजप आणि शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ‘आपण दोघे भाऊ, मिळून वाटून खाऊ’ अशा भूमिकेतून सत्ता उपभोगणा-या या दोन्ही पक्षांना आता खाली उतरवण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून त्याबाबतची बोलणी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी मंचावर विधिमंडळ उपगट नेते आ.विजय वडेट्टीवार, अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव आणि विदर्भ समन्वयक आशिष दुवा, माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आशिष देशमुख, आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आनंदराव गेडाम, अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू वाघमारे, अतुल लोंढे, किशोर गजभिये, रविंद्र दरेकर, जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, अमर वराडे, अनंत गावड यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मंचावर विराजमान होते. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक सतीश विधाते तर आभार प्रदर्शन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिल्हाभरातील नागरिक उपस्थित होते.
सर्व चौकीदार चोर नाहीतकाँग्रेसचे विधीमंडळातील उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खोट्या आश्वासनांचा समाचार घेताना ‘चौकीदार ही चोर है’ असे नारे प्रेक्षकांकडून वदवून घेतले. तो धागा पकडत खा.अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात सर्वच चौकीदार चोर नाहीत, तर ‘देशाचा चौकीदार चोर आहे’ असा नारा दिला. देशाच्या चौकीदारामुळे इमानदारीने काम करणारे बिचारे इतर चौकीदार बदनाम होऊ नये, अशी कोपरखळी त्यांनी मारली.
धानाला ८०० रुपये अनुदान द्याशेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेशात सत्तेवर आलेले काँग्रेसचे सरकार धानाला २५०० रुपये भाव देत आहे. पण महाराष्ट्रातील सरकारला आपल्या शेतक-यांची फिकीर नाही. शेतक-यांना आता प्रतिक्विंटल ८०० रुपये अनुदान दिले पाहीजे अशी अपेक्षा खा.चव्हाण यांनी व्यक्त केली.
जनता म्हणेल त्यालाच उमेदवारी
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसमधून ४-५ लोक इच्छुक आहेत. पक्षाचा विजय नक्की होणार याचे हे संकेत आहे. पण कोणी कोणाच्या जवळचा आहे यावर नाही, तर जनता ज्याच्या बाजुने असेल त्याला उमेदवारी मिळेल. हीच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा.चव्हाण यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.