मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, महागाईचा आगडोंब उसळला आहे, हे सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरले आहे. आमचे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊ, महागाई नियंत्रणात आणू, तसेच प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देऊ, अशा घोषणा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केल्या.
बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत, काँग्रेसच्या खा. वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. “मराठी माणसाची मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला आहे. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे सुरू आहेत. मुंबईची ब्ल्यू प्रिंट नीती आयोगाला देऊन महापालिकेचे महत्त्व कमी करण्याचा डाव आहे. पण, मुंबईवर घाला घालण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा”, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
निवडणुकीच्या प्रचाराबरोबरच सोमवारी महायुतीच्या प्रचाराच्या थापासुद्धा थंडावणार आहेत. त्यांनी केलेल्या घोषणासुद्धा त्यांच्यासारख्याच फसव्या आहेत. परंतु, आम्ही जनतेला दिलेल्या वचननाम्यामधील प्रत्येक वचनामागे पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रात प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याचा आम्ही वादा केला आहे. कारण, आम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.
...तर एमएमआरडीएसुद्धा रद्द करू!
धारावी आणि आसपासचा परिसर, मिठागरे, वीज अदानीला, बंदरे अदानीची, विमानतळ अदानीकडे, त्यामुळे अदानीची सुलतानी आता संपवायला पाहिजे, असे यावेळी ठाकरे म्हणाले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात करार केला जात आहे. मुंबई संपवणार असाल तर आम्ही सत्तेत येताच एमएमआरडीएसुद्धा रद्द करू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
सात हजार रुपये सोयाबीनला देणार
महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले असून, शेतमालाला भाव मिळत नाही. आमचे सरकार असताना आम्ही सोयाबीनला साडेसहा हजार रुपये भाव दिला होता. आता पुन्हा सत्तेत येतात सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव देऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
वाढवण, मुरबे बंदर रद्द करण्यासाठी संधी द्या!
पालघर/बोईसर : वाढवण आणि मुरबे ही बंदरे कायमची रद्द करण्याची ही शेवटची संधी असून, तुम्ही आमचे दोन उमेदवार निवडून आणा, आमचे सरकार निवडून आल्यास कोणत्याही परिस्थितीत मी ही बंदरे होऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे, अशी ग्वाही उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथे प्रचारसभेत दिले.
महाविकास आघाडीचे पालघरचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसरचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्या प्रचारासाठी ठाकरे बोईसर येथे आले होते. यावेळी त्यांनी वाढवणचा मुद्दा प्रकर्षाने मांडत यावेळी जर मशाल पेटली नाही, तर तुमच्या डोक्यावर वाढवणचा वरवंटा फिरवला जाईल, असा इशारा दिला.
पालघरमध्ये चिंतामण वनगांच्या घराचा आदर ठेवीत श्रीनिवासला निवडून आणले आणि तो तिकडे गेला. आता त्याचा वापर करून त्याला कसा फेकून दिला हे बघताच, अशी टीका त्यांनी केली.