नागपूर : देशातील इतिहास, संस्कृती व शिक्षणक्षेत्रात डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आपले विचार लादले व अनेक बाबी काळाच्या पडद्याआड गेल्या. प्रत्यक्षात ज्यावेळी इतिहासातील तथ्य समोर आणण्याचा प्रयत्न होतो तेव्हा भगवीकरणाची ओरड करण्यात येते. वास्तविकता समोर आणणे हे भगवीकरण नाही, असे परखड मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात आयोजित अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष खा. अजय संचेती, अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाचे अध्यक्ष डॉ.विमल प्रसाद अग्रवाल व अन्य मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिक्षणाचे योग्य बीजारोपण झाले नाही व त्यामुळेच अनेक समस्या व आव्हाने निर्माण झाली. देशाच्या शिक्षणप्रणालीतून संस्कृती व इतिहासाचे मूळ समोर आले पाहिजे आणि विकास साधताना हे आवश्यकच आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शिक्षणक्षेत्राच्या व्यावसायिकीकरणावर चिंता व्यक्त केली. इतर क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातदेखील सामाजिक मूल्यांचा ऱ्हास झालेला दिसून येत आहे. अनेक शिक्षकांनी शिक्षणाला व्यवसाय समजून काम सुरू केले आहे. यातून आदर्श पिढी कशी निर्माण होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘एकम् सत्’ या स्मरणिकेचे तसेच ‘एकात्ममानव दर्शन’ या शैक्षणिक मंथन विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. या अधिवेशनाला विविध राज्यांतील बाराशेहून अधिक प्रतिनिधी आले आहेत. आयुर्वेद विद्यापीठ गरजेचेराज्यात आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. या विद्यापीठाचे मॉडेल कसे असावे? ते पूर्णत: सरकारी विद्यापीठ असावे की, आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत संस्थांनी व व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन करावे? किंवा विद्यापीठ कायद्याअंतर्गत स्थापन व्हावे याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे दिली. श्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती महोत्सवाअंतर्गत सुवर्ण जयंती स्मरणिका ‘बखरश्रीची’चे प्रकाशन तसेच १७ रसाचार्यांच्या सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.
वास्तव समोर आणणे, हे भगवीकरण नव्हे
By admin | Published: October 10, 2015 3:11 AM