आविष्कार देसाई,
अलिबाग- महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील २६ ब्रिटिशकालीन पूल सरकारच्या हिटलिस्टवर आले आहेत. यामध्ये पाऊणशे वर्षांपासून नागोठणे येथील शिवकालीन असणारा ४३६ वर्षे जुन्या पुलाचा समावेश आहे. पुलाचे स्ट्रक्टरल आॅडिट करण्यासाठी अद्याप सरकारकडून आदेश आलेले नाहीत. पुलाचे आॅडिट न करता त्या पुलाखालून वाहणारी नदी, बेकायदा रेती उत्खनन, माती, पर्यावरण, आजूबाजूचा परिसर, बदललेली भौगोलिक स्थिती, तेथे असणारे अन्य पूल अशा विविध मुद्यांचे आॅडिट होण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर महाडसारख्या अन्य दुर्घटना होऊन हजारो निष्पाप जीव पुन्हा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाडमधील सावित्री नदीवरील पूल पडल्याने आतापर्यंत २२ जणांचे बळी गेले आहेत, तर अन्य बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. महाडचा पूल पडल्याने सरकार खबडून जागे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सर्वच ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे फर्मान सोडले. ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांनी जवळजवळ शंभरी पार केलेली आहे. त्यामुळे पूल बांधताना जी परिस्थिती होती, ती बदलली आहे, पर्यावरणामध्ये कमालीचा बदल झाला आहे. पुलांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा रेती उत्खनन होते. त्यामुळे रेती उत्खननाचा मुद्दा विचारात घेणे गरजेचे आहे. ब्रिटिश राजवटीत उभारण्यात आलेल्या पुलांबाबत मुदत संपल्यावर डागडुजीसाठी वेळच्या वेळी माहिती देण्यात येत आहे. परंतु स्थानिक प्रशासनाकडून पुलांच्या डागडुजीकडे तसेच देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. नदीच्या परिसरामध्ये वाढलेली नागरी वस्ती, ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलाच्याच बाजूला नव्याने बांधलेले पूल यांचाही आॅडिटमध्ये प्राधान्यक्रमाने समावेश करणे आवश्यक आहे. तसे केले तरच परिपूर्ण आॅडिट होऊन नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल. रोहा : महाड येथील सावित्री नदीवरील ८८ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्यानंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. रोहा तालुक्यात एकूण ६ मोठे व ३३ लहान पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. मुंबई-गोवा महामार्गावरील निडी, वाकण, कोलाड या ठिकाणी मिळून चार मोठे पूल आहेत. यातील प्रमुख पुलांचे वयोमान ५० वर्षांहून अधिक आहे. रोहा-अष्टमीला जोडणारा जुना पूल कुंडलिकेच्या प्रवाहात आजही तग धरून आहे. १५८० मध्ये बांधण्यात आलेल्या शिवकालीन अंबा नदीवरील पुलावरून जाण्यास सध्या अवजड वाहने व बसला बंदी घालण्यात आली आहे. मात्र हलकी वाहने, दुचाकी आजही पुलाचा उपयोग करतात. या पुलामध्ये निडी, वाकण येथील अंबा नदीवरील पूल, कोलाडजवळील मिहसदरा व कुंडलिका नदीवरील पुलांचा समावेश आहे. हे चारही पूल मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थापनेपासून असल्याने ८० वर्षांहून अधिक जुने आहेत. आयपीसीएल कारखान्याकडे जाणारा पूल वगळता उर्वरित पुलांचे बांधकाम १९५९ ते १९६0 काळातील आहे. चारही पूल मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थापनेपासून असल्याने ८० वर्षांहून अधिक जुने आहेत. मोठ्या पुलांमध्ये ६ पुलांचा समावेश असून त्यांची लांबी किमान ३० मीटरहून अधिक आहे. यात रोहा शहर व अष्टमी गाव यांना जोडणारा कुंडलिका नदीवरील पूल, खारेपाटी गावाजवळील गुजर कातळजवळील पूल, निडी-भातसई गावांना जोडणारा पूल, वरसेतील गंगा नदीवर असणारा पूल, आयपीसीएल कारखान्याकडे जाण्यासाठी उभारलेला नागोठणेतील पूल आदींचा समावेश होतो. >जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत मिळालेल्या माहितीमध्ये २६ ब्रिटिश कालीन पूल आढळून आले आहेत. ती यादी अजूनही अपडेट होईल. सरकारकडून अद्यापही प्रशासनाला लेखी आदेश आलेले नाहीत.- सतीश बागल, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड