- राजेश निस्ताने
यवतमाळ, दि. ४ : अमरावती महसूल विभागात ब्रिटिशकालीन तब्बल ४४ पूल असून सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात आहे. हे सर्व पूल सुस्थितीत आणि वाहतुकीस योग्य असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम खात्याने केला आहे. कोकणातील महाडचा ब्रिटिशकालीन पुल वाहून गेल्याने अनेक वाहने त्यात पडली आणि नदीत वाहून गेली. या पुलाची आयुष्य मर्यादा संपल्याने तो धोकादायक असल्याचे तीन वर्षांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आणि अनेकांचा बळी घेणारी घटना पूल वाहून गेल्याने घडली.
महाड घटनेच्या निमित्ताने राज्यभरातील ब्रिटिशकालीन पुलांच्या सद्यस्थितीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अमरावती विभागातील ब्रिटिशकालीन पुलांची संख्या व स्थितीचा आढावा घेतला असता सकारात्मक चित्र पुढे आले.
सूत्रानुसार, पश्चिम विदर्भात ब्रिटिशकालीन एकूण ४४ पूल आहेत. त्यामधील सर्वाधिक २७ पूल एकट्या अमरावती जिल्ह्यात आहेत. त्यातही मेळघाटात या पुलांची संख्या अधिक आहे. बुलडाणा जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात चार तर यवतमाळ जिल्ह्यात एक ब्रिटिशकालीन पुल आहे. वाशिम जिल्ह्यात ब्रिटिशकालीन एकाही पुलाची नोंद नाही. यातील १८ पुल हे स्टोन आर्च असलेले, १६ पूल हे वाय आर्च असलेले तर दहा स्लॅब असलेले आहेत. विभागातील हे सर्व ४४ पूल सुस्थितीत आणि वाहतुकीस योग्य असल्याचा दावा बांधकाम खात्याने केला आहे.
पुलांची उंची आणि रुंदी वाढविणार४४ पैकी काही पुलांची उंची आणि रुंदी कमी आहे. त्यामुळे वाहतुकीत काहीशा अडचणी निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी या पुलांची उंची व रुंदी वाढविण्याचे प्रस्ताव आहे. अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह ते अचलपूर मार्गावरील एक ब्रिटिशकालीन पुल पाडून नव्याने बांधकाम केले जाणार आहे. कारण हा पूल अरुंद आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव आणि बजेट नुकतेच मंजूर झाले आहे. ब्रिटिशांनी १९३० नंतर केलेल्या पुलांचे बांधकाम स्लॅबचे आणि उत्तम आहे.
या पुलांना पुढील आणखी कित्येक वर्ष काहीच धोका नाही. यवतमाळ जिल्ह्यातील अडाण नदीवर बांधलेल्या बोरीअरबच्या पुलाची अलिकडेच दुरुस्तीही करण्यात आली होती. या पुलाची उंची काही प्रमाणात कमी होती. परंतु आता तेथून वाहतुकीला कोणतीही अडचण नाही.
विदर्भ विकासाच्या कालबद्ध कार्यक्रमातून १५ वर्षांपूर्वी ब्रिटिशकालीन पुलांचे नूतणीकरण व दुरुस्ती करण्यात आली. त्यात अमरावती विभागातील बहुतांश पुल सुस्थितीत करून घेण्यात आले. त्यामुळेच आज या पुलांना कोणताही धोका नसून तेथून वेगवान वाहतूक करणे सहज शक्य असल्याचे बांधकाम सूत्रांनी सांगितले. विभागातील पूलजिल्हा - संख्याअमरावती - २७अकोला - ०४बुलडाणा - १२यवतमाळ - ०१एकूण - ४४ अमरावती विभागाच्या चारही जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन ४४ पुलांची कोणतीही समस्या नाही. आवश्यकता पडेल तेव्हा या पुलांची देखभाल दुरुस्ती केली जाते. - शेखर तुंगे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, अमरावती
आणखी वाचा
वर्धेतील २५ पुल मरणपंथाला, पुलगावचा पुल तर १५० वर्ष जुना