नागपूर : विदर्भातील मागास जिल्ह्यांपैकी असलेल्या गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांकडे कुणाचे लक्ष नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथून नागपूरपर्यंतच्या ब्रॉडगेजकरणाला मान्यता मिळाली. मात्र तरतूद करण्यात आली नाही. नक्षलग्रस्त गडचिरोली व गोंदियामधील प्रकल्पांची अशीच स्थिती आहे.मागील ३० वर्षांपासून नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गाचे काम रखडलेले आहे. या प्रकल्पासाठी ४७० कोटी रुपयांची गरज असताना केवळ १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आहे. १८ वर्षांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने गोंदिया-जबलपूर या २८५ किलोमीटर नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठीे मंजुरी दिली. मात्र अजूनही हे काम पूर्णत्वास गेले नाही. या काळात सरकारे बदलली, पण प्रकल्पाच्या कामावर कोणता परिणाम झाला नाही. अनेक अडचणींचा गुंता सोडविताना हा प्रकल्प आता नेमका कधी पूर्ण होणार, याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.भंडारा-वरठी मार्गावर प्रस्तावित शटल रेल्वे प्रकल्पाला ५ कोटी रुपयांची गरज आहे. गत १० वर्षांत या प्रकल्पाची किंंमत दुपटीने वाढली. जवळपास दोन दशकांपासून रेंगाळत असलेल्या शटल रेल्वेचा प्रस्ताव आगामी अर्थसंकल्पात पारित होणार काय? याबाबत अजूनही साशंकता व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वे, भुसावळ विभागात बडनेऱ्यातून रोज २५ ते ३० गाड्या धावतात. दोन वर्षांपूर्वी या रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी एस्कीलेटर (स्वयंचलित पायऱ्या) निर्माण केल्या जातील, अशी घोषणा तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार, एस्कीलेटर लावण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी जागेची पाहणीसुद्धा केली. आवश्यक खर्च आणि प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. दोन वर्षे लोटली तरी एस्कीलेटर अद्याप लागले नाही. (प्रतिनिधी)
ब्रॉडगेजचे काम रखडले
By admin | Published: February 25, 2015 1:46 AM