नांदेड - राखी पौर्णिमेला बहीण भावाला राखी बांधून आजन्म संरक्षणाची हमी घेते, अशी संस्कृती सांगते. याचाच प्रत्यय देणारे उदाहरण नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळाले. बिलोली तालुक्यातील शिंपाळा येथील सुरेश गंगाराम गरबडे यांनी मृत्यूशी झुंज देणाऱ्या बहिणीला किडनी देऊन नव्या आयुष्याची भेट दिलीय. नोव्हेंबर महिन्यात औरंगाबादमध्ये हे किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले असून, बहीण-भाऊ दोघांचीही तब्येत ठणठणीत आहे.
देगलूर तालुक्यातील खानापूर येथील विजया आत्माराम शिंगाडे यांची प्रकृती वर्षभरापूर्वी खालावली. किडनीचा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढे तर डायलिसिसशिवाय पर्याय राहिला नाही. इकडे विजया शिंगाडे यांचे भाऊ सुरेश गरबडे यांना मात्र बहिणीची चिंता सतावू लागली. एक बहीण गमावली. आता दुसऱ्या बहिणीला गमवायचे नाही. कसेही करून तिला वाचवायचेच, असा निर्धार त्यांनी केला. त्यांनी मी आहे, घाबरू नको, असा धीर बहिणीला दिला आणि माझी किडनी तुला देईन, असा शब्द दिला.
मात्र, ही सर्व प्रक्रिया सोपी नव्हती. औरंगाबाद येथे सिग्मा हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीगणेश बनरेला यांच्याकडे दाखविले. २३ ऑगस्ट २०२२ रोजी सुरेश गरबडे यांच्या तपासण्या केल्या. बहीण आणि भावाचा रक्तगट एकच होता. त्यामुळे डॉक्टरांनी पुढील प्रक्रिया सुरू केली. पोलिस प्रशासनाची परवानगी आणि इतर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ठरली. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी डॉ. श्रीगणेश बरनेला, डॉ. अरुण चिंचोले, डॉ. महाजन, डॉ. सारूक यांच्या नेतृत्वाखाली किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली.
व्यसनांचाही केला त्याग किडनी देणे ही बाब तशी सोपी नव्हती. सुरेश गरबडे यांना विडी ओढणे आणि इतरही व्यसन होते. हे व्यसन सोडल्याशिवाय किडनी देता येणार नव्हती. अनेक वेळा शरीराची अस्वस्थता सहन केली; पण बहीण जगली पाहिजे, या एकाच ध्येयाने त्यांनी दोन्ही व्यसनांचा त्याग केला.