योगेश गुंड, अहमदनगरदीपावलीत करदोऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दीपावलीतील भाऊबीजेचा उत्सव करदोऱ्याशिवाय साजराच होऊ शकत नाही. राखीप्रमाणेच बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असणारा हा करदोरा बनविण्याचे काम जिल्ह्यातील मुस्लीम कुटुंबाची पाचवी पिढी करीत आहे. चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील इम्रान युसुफशेठ आसार यांचे सारे घरदार एक महिन्यापासून करदोरा बनविण्याच्या कामात व्यस्त आहे. अगदी लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत घरातील साऱ्यांचेच हात करदोरा बनविण्याच्या कामात गुंतले आहेत. गेल्या पाच पिढ्यांपासून करदोरा बनविणे व विकणे हा त्यांचा पिढीजात व्यवसायच बनला आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी यमद्वितीया म्हणजे भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. बहीण भावाला ओवाळून त्याला करदोरा बांधण्यासाठी देते. करदोरा बनविण्याची पद्धती व कला आम्हाला आमच्या घरच्यांकडूनच शिकायला मिळाली. नगरमधून काळ्या-लाल रंगाचा कच्चा माल आणून तो चरख्यावर विणला जातो. साधारण सरासरी ४२ इंच असणारा धागा तयार करून या धाग्याला गुंडी लावली जाते. त्यानंतर त्यावर पिवळ्या रंगाचा दोरा चढवावा लागतो. सर्वांत शेवटी रेशमी पालखी गोंडा लावून करदोरा तयार केला जातो. यातून मिळणारे उत्पन्न अल्प असले तरी महाराष्ट्रीय म्हणून आपली वेगळी ओळख करून देणारा करदोरा बनविण्याचे भाग्य मिळते, असे इम्रान आसार यांनी सांगितले. या व्यवसायातूनच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या व्यवसायात इतर कारागीर असले तरी गोंडा पालखी करदोरा बनविण्यात आमच्या कुटुंबाचा हातखंडा असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुस्लीम कुटुंबाची अशीही ‘भाऊबीज’
By admin | Published: October 24, 2014 4:00 AM