लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने बडतर्फी व सेवासमाप्ती या प्रकारची कारवाई करून घरी पाठविले आहे, अशा दहा हजारांवर कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची तयारी महामंडळाने सुरू केल्याची माहिती आहे; मात्र या कर्मचाऱ्यांना यासाठी विभाग नियंत्रकांकडे अपील करायचे आहे. ही संधी किती कर्मचारी घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील सव्वातीन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी कामावर यावे, यासाठी महामंडळाने विविध प्रयोग केले. बडतर्फ, निलंबन, कारणे दाखवा नोटीस, बदली अशाप्रकारची कारवाई करण्यात आली. यानंतरही कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. एसटीचे शासनात विलीनीकरण शक्य नाही, ही घोषणा शुक्रवारी झाल्यानंतर कर्मचारी कामावर येण्याची संख्या वाढेल, अशी अपेक्षा महामंडळाला होती.
असे केले जाईल सामीलबडतर्फ कर्मचाऱ्यांना विभाग नियंत्रकांकडे अपील करावे लागेल. त्यावर सुनावणी होईल. त्यात कर्मचाऱ्याला कामावर घेण्याचा निर्णय घेतला जाईल. बडतर्फीच्या प्रकरणात कर्मचाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागते; मात्र कामावर रूजू होण्याचे मार्ग खुले होतात.
सावध भूमिकाnकर्मचाऱ्यांनी १० मार्चपर्यंत कामावर येण्याचे आवाहन केले आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. nमहामंडळाने ४ व ५ मार्च या दोन दिवसांत दोन परिपत्रके काढली आहेत. त्यामध्ये संपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेण्यासाठी कोणतीही नोटीस देऊ नका, दिली असल्यास परत घेण्याच्या सूचना विभागीय कार्यालयांना करण्यात आल्या.