मुंबई - तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.सी आर यांचा नवा राजकीय पक्ष भारत राष्ट्र समितीनं महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. नांदेड इथं आज मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा झाली. या सभेला मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. केसीआर यांचा BRS पक्ष आगामी काळात महाराष्ट्रात सर्व जागा लढवणार असा विश्वास खासदार भीमराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
खासदार भीमराव पाटील म्हणाले की, तेलंगणा राज्यात केसीआर यांचे सरकार आल्यापासून विकासाची कामे सुरू आहेत. सर्व जातीजमाती, शेतकऱ्यांसाठी आम्ही काम केले. हाच अजेंडा घेऊन आम्ही इतर राज्यात जाणार आहोत. आंधप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक याठिकाणी आम्ही जात आहोत. अनेकांनी इच्छा होती आम्ही तेलंगणात यायला हवं. ते शक्य नव्हतं. मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत येणाऱ्या काळात तुमच्या राज्यात येऊन या सर्व स्कीम राबवेन असं म्हटलं होते त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्ये सभा झाली असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत नांदेडमध्ये सभा घेण्यामागे उद्दिष्ट म्हणजे हे चांगले प्रेक्षणीय स्थळ आहे. गुरुद्वाराला दर्शन करण्याची इच्छा होती. मराठवाड्याशी निजाम कनेक्शन आहे. हैदराबादशी कनेक्टेड असल्यानं जुनं नातं आहे. गेल्या ८ वर्षापासून विकासासोबतच अनेक योजनांच्या माध्यमांतून लोकांची सेवा केली आहे. प्रत्येक माणसाची गरज बघून मागासवर्गीय असो वा कुणीही सगळ्या यंत्रणा उभ्या करून त्यांना मदत केली आहे. सर्व सवलती शेतकऱ्यांना देण्याचा आमचा मानस आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रात आम्ही काम केले आहे. हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करणार आहोत असंही खासदार भीमराव पाटील म्हणाले.
दरम्यान, आम्ही कुठल्याही पक्षावर आणि नेत्यांवर टीका करणार नाही. विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करणार आहोत. जे विकास आणि शेतकऱ्यांसाठी काम करतील ते सोबत येतील. आमच्या विचारांचे जे लोक असतील त्यांच्यासोबत आम्ही युती किंवा आघाडी नक्की करू. बऱ्याच नेत्यांशी आमची चर्चा सुरू आहे. तेलंगणा राज्याकडून जे काही पुर्तता आहे ते आम्ही पूर्ण केलेत. महाराष्ट्रानेही पुढाकार घेतला आहे. लवकरात लवकर वादग्रस्त विषय संपवून टाकू असंही खासदार बी.बी पाटील (भीमराव पाटील) यांनी सांगितले.