नागपूर : सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार पाशवी अधिकार वापरत आहेत. दडपशाही आणि हुकूमशाहीने लोकशाही चालवली जाणार असेल तर हे घटनाविरोधी आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केंद्र सरकावर हल्ला चढवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून विधानसभेत चर्चा ठेवण्यात आली होती. या चर्चेची सुरुवातच चव्हाण यांनी केली.आपण काही वर्षे सीबीआय हा विभाग सांभाळला आहे. आमच्याही वेळी त्या विभागाच्या अडचणी होत्या. या संस्थेचा वापर कसा होतो हा वेगळा विषय आहे. मात्र वीरभद्रसिंह, अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर छापा टाकला. पी. चिदंबरम यांचा मुलगा, अशोक गेहलोत, सचिन पायलट, वायलर रवी आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनादेखील सीबीआयचा वापर करून छापे टाकले जात आहेत. कार्यपालिकेचे काम जर असे पाशवी अधिकार वापरून चालवले जाणार असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेच्या मूलभूत हक्कांना तडा देण्याचे हे काम ठरेल. त्यासाठी आम्हाला घटना बचाव आंदोलन पुन्हा एकदा हाती घ्यावे लागेल असे सांगून चव्हाण म्हणाले, आज लोक पुरस्कार परत करीत आहेत. याआधीही केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. त्या काळात गोध्रासारखी घटना घडली होती. पण तेव्हा पुरस्कार वापस केले गेले नाहीत, कारण त्यावेळी अटलजींनी त्या घटनेचा निषेध करीत ज्या राज्यात हे घडले त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका घेतली होती. आज अशा घटना घडत असताना सर्वोच्च पदावर बसणाऱ्यांनी साधा निषेध करण्याचेही सौजन्य दाखवले नाही, असे सांगत चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. स्पृश्य-अस्पृश्यतेच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच गांधीजींचा वध कोणी केला हा इतिहास जगापुढे आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी बाबासाहेबांनी ओपन, ओबीसी, दलित आणि आदिवासी अशा चार घटकात सगळ्या जाती आणत जातीयवाद कमी केला, असे सांगितले. (प्रतिनिधी)समरसता ही काय भानगड आहे? : बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना केंद्र सरकारने त्याला बंधूता व समरसता असे नाव दिले. समरसता हा शब्द कोठून आला. इंग्रजीत याचा कोणताही अर्थ दिलेला नाही. समरसता ही आरएसएसची लाडकी संकल्पना आहे. सर्व समाज एकत्र येऊन आपले जीवन एका विचाराला स्वत:हून समर्पित करणे म्हणजे समरसता. यात कोणत्या तरी विचारप्रणालीला पुरस्कृत करण्याची धोकादायक संकल्पना आहे असा गंभीर आरोप करीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्वातंत्र्य, बंधूता आणि समता हे शब्द बाबासाहेबांच्या घटनेने दिले. मात्र हे शब्द सोडून समरसता हा शब्द आणला गेला याचाच अर्थ संघाची संकल्पना केंद्र सरकार राबवण्यास निघाली आहे.
सीबीआयच्या माध्यमातून पाशवी अधिकार वापरले जात आहेत!
By admin | Published: December 18, 2015 2:35 AM